पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या रोहित शर्माच्या भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात दमदार पुनरागमन केलं. बांगलादेशने विजयासाठी दिलेलं १५४ धावांचं आव्हान भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कर्णधार रोहित शर्माने ८५ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या विजयासह भारतीय संघाने विक्रम करत ऑस्ट्रेलियाला मागे टाकलं आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : अर्धशतकी खेळीसह रोहित शर्माची सचिनशी बरोबरी

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हा ४१ वा विजय ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने धावांचा पाठलाग करताना ४० सामना जिंकले आहेत. भारताने या निकषात ऑस्ट्रेलियावर नुसती मात केली नसून त्यांच्या विजयाची टक्केवारी ही ऑस्ट्रेलियापेक्षा सरस आहे. रोहित शर्माला त्याच्या अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

रोहित शर्माला शिखर धवनने ३१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. या मालिकेतला अखेरचा सामना १० तारखेला नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : रोहित सचिनसारखा खेळतोय, विराटलाही हे जमणार नाही !