इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी संघाबाहेर गेला. यानंतर नवीन वर्षात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता तब्बल ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजनही आयसीसीने पुढे ढकललं. या सर्व धामधुमीत महेंद्रसिंह धोनी आपली पत्नी व मुलीसह रांची येथील फार्महाऊसमध्ये राहत होता. धोनीने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नसल्यामुळे टी-२० विश्वचषकासाठी धोनी संघात खेळणार का ही चर्चा नेहमी रंगलेली असते. परंतू भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या मते टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाला महेंद्रसिंह धोनीची गरज नाही.

आपल्या यू-ट्युब चॅनलवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देताना आकाश चोप्राने हे मत मांडलं आहे. भारतात २०२१ साली होणाऱ्या टी-२० विश्वचषकात धोनीचं संघात असणं गरजेचं आहे का असा प्रश्न एका चाहत्याने आकाशला विचारला. यावर उत्तर देताना आकाशने भारतीय संघ धोनीशिवाय मैदानात चांगली कामगिरी करु शकतो असं म्हटलं आहे. “माझ्यामते भारतीय संघ धोनीशिवाय चांगला खेळू शकतो. २०२१ टी-२० विश्वचषकाबद्दल बोलत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे ही स्पर्धा वर्षाअखेरीस असणार आहे. विश्वचषक भारतात आयोजित होत असल्यामुळे धोनीने खेळावं अशी चाहत्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे, पण धोनीला खेळायचं आहे का हा खरा प्रश्न आहे. माझ्यामते धोनीला आता खेळायचं नाहीये.”

यापुढे बोलत असताना आकाशने भारतीय संघाला आता धोनीशिवाय खेळायची सवय लावून घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. २०२१ टी-२० विश्वचषकाला अजून वर्ष बाकी आहे आणि हा काळ मोठा आहे. तोपर्यंत काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. धोनी संघात नसेल तर भारतीय संघ विश्वचषक जिंकणार नाही अशी आता परिस्थिती नाही त्यामुळे टी-२० विश्वचषकासाठी आता धोनीची गरज नसल्याचं आकाश चोप्रा म्हणाला. सध्या धोनी आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करतो आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे.