गेली २४ वर्षे क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवल्यानंतर निवृत्त झालेल्या सचिन तेंडुलकरने रविवारी फुटबॉलच्या मैदानावरही जोरदार ‘बॅटिंग’ केली. २०१७चा १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक भारतात होणार असल्यामुळे २०२२ साली भारत फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरू शकतो, अशी आशा मास्टरब्लास्टर सचिनने व्यक्त केली.
तो म्हणाला, ‘‘भारत २०१७च्या युवा फिफा विश्वचषकाचे आयोजन करत आहे. त्यामुळे २०२२ हे साध्य होऊ शकणारे उद्दिष्ट आहे, असे मला वाटते. त्यामुळे आतापासूनच मेहनत घेण्याची गरज आहे. कुणीही थेट १००व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. हे लक्ष्य गाठण्यासाठी पहिल्या मजल्यापासूनच सुरुवात करावी लागेल. फिफा विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न एका रात्रीत पूर्ण होऊ शकणार नाही. हा एक खडतर प्रवास आहे. या प्रवासात येणारे अडथळे, खाचखळगे भारताला पार करावेच लागतील. त्यासाठी अचूक रणनीती आणि कठोर परिश्रम घ्यावे लागतील. अद्ययावत सोयीसुविधा आणि युवा खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे लागेल. व्यावसायिक स्तरावर या गोष्टी एकत्र येतील, तेव्हाच भारताच्या पदरी यश पडत जाईल.’’
‘‘फुटबॉलमध्ये मोठी मजल मारण्यासाठी योग्य व्यवस्था राबबावी लागेल. त्यानंतरच आपण जागतिक स्तरावरील अव्वल संघांना टक्कर देऊ शकू, अशी आशा बाळगता येईल. एकामागोमाग शिखरे गाठत गेल्यास, नक्कीच निकाल भारताच्या बाजूने लागतील,’’ असे सचिनने सांगितले.
पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या करंडकाची प्रतिकृती कोलकात्यात आणण्यात आली होती. त्या निमित्ताने निवृत्तीनंतर प्रथमच सचिन कोलकातात आला होता. कोलकातातील चाहत्यांचे आभार मानत सचिन म्हणाला, ‘‘कोलकातात यायला मला नेहमीच आवडते. येथील फुटबॉलप्रेमी जनता फिफा करंडकाचे मानाने स्वागत करेल, अशी आशा आहे. एका खेळाडूसाठी विश्वचषक जिंकणे, हे अंतिम ध्येय असते. २०११चा आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर माझ्या आयुष्यातील एक संपूर्ण चक्र पूर्ण झाले. १९८३मध्ये मी कपिल देवने उंचावलेला विश्वचषक पाहिला, तेव्हा एके दिवशी माझ्या हातात विश्वचषक असेल, असे मी म्हटले होते. तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी खडतर परिश्रम घेतले. हे ध्येय गाठण्यासाठी मला कारकिर्दीत २२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.’’