सद्य:परिस्थितीत भारत आणि इंग्लंड हे दोनच संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केले. मात्र, ऑस्ट्रेलियालाही विजेतेपदावर पुन्हा नाव कोरण्याची संधी असल्याचा दावा पाँटिंग यांनी केला.

‘‘माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे वर्षभराच्या बंदीनंतर ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे फलंदाजीला अधिक बळकटी आली असून संघ समतोल झाल्याने ऑस्ट्रेलियादेखील त्यांचा मुकुट कायम राखण्याच्या स्थितीत आहे,’’ असे पाँटिंगने सांगितले.

तो म्हणाला, ‘‘भारत आणि इंग्लंड हे संघ सध्या दमदार दिसत असले तरी ऑस्ट्रेलिया त्यापेक्षा फार मागे नाही. किंबहुना स्मिथ आणि वॉर्नरच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सक्षम बनला आहे. मी या संघाच्या प्रशिक्षकांपैकी एक असल्यामुळे तसे म्हणत नाही. इंग्लंडमधील वातावरण हे ऑस्ट्रेलियाला अधिक अनुकूल असल्याने माझे मत आहे. तसेच स्मिथ आणि वॉर्नर हे दोघेही अत्यंत चांगले फलंदाज असण्याबरोबरच ते कोणताही दबाव सहजपणे हाताळू शकतात. त्यामुळे ऑस्ट्रेलियाही विश्वविजेता बनण्यासाठी दावेदार आहे, असे मला वाटते.’’