आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाचे अध्यक्ष व्लादिमिर लिसिन यांची घोषणा

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

नवी दिल्ली : पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारल्याच्या कारणास्तव दिल्लीतील विश्वचषक नेमबाजी स्पध्रेमधील १६ जणांचा ऑलिम्पिक कोटाच रद्द करण्यात येत असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाचे अध्यक्ष व्लादिमिर लिसिन यांनी केली आहे.

जम्मू-कश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान मारण्यात आल्याने भारतीय नेमबाजी संघटनेने पाकिस्तानच्या नेमबाजांना या विश्वचषक स्पर्धेसाठीचा व्हिसा नाकारला आहे. मात्र अशा प्रकारे व्हिसा नाकारण्याच्या कारणावरून पाकिस्तानी नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय संघटनेकडे तक्रार करून दाद मागितली होती. त्यावर संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष लिसिन यांनी या स्पर्धेतील सर्वाधिक महत्त्वाचा भाग असलेला १६ नेमबाजांचा ऑलिम्पिक कोटाच काढून टाकत असल्याचे जाहीर केले.

‘‘१६ जागांचा कोटा ऑलिम्पिकपूर्वीच्या पुढील विश्वचषकांमध्ये विभागून दिला जाईल.आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणून आमच्यावर काही र्निबध आहेत,’’ असेही लिसिन यांनी नमूद केले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची आणि कार्यकारी मंडळाची बैठक भारतीय प्रमाण वेळेनुसार शुक्रवारी मध्यरात्री २.३० वाजता स्वित्र्झलडमध्ये होणार आहे. त्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते. भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी अद्याप कोणताही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला नसल्याचे सांगितले. याबाबत शासनापासून आंतरराष्ट्रीय महासंघापर्यंत बैठका सुरू असून त्यानंतरच निर्णय कळेल, असेही रणिंदर सिंग यांनी नमूद केले.