करोनानंतरच्या काळातील सामन्यांबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीला चिंता

नवी दिल्ली : करोनानंतरच्या काळात क्रिकेटच्या सामन्यांमध्ये कोणते बदल घडतील, हे मी ठामपणे सांगू शकत नाही. किंबहुना सध्याचे चित्र पाहता क्रिकेटच्या भवितव्याबाबतच माझ्या मनात काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून जगभरातील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गेल्या आठवडय़ात जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करोनानंतरच्या काळातील क्रिकेटमध्ये अनेक बदल दिसतील, अशी शक्यता आहे. परंतु संघसहकारी रविचंद्रन अश्विनशी ‘इन्स्टाग्राम लाइव्ह’च्या माध्यमातून साधलेल्या संवादामध्ये कोहलीने करोनामुळे क्रिकेटमध्ये घडणाऱ्या बदलांविषयी चिंता प्रकट केली आहे.

‘‘करोनानंतरच्या काळात क्रिकेटमध्ये कोणते बदल असतील, याविषयी मी खरेच काहीही सांगू शकत नाही. सरावादरम्यानच आम्हाला कदाचित अनेक नियमांचे पालन करावे लागेल, तर सामन्याविषयी विचार न केलेलाच बरा. संघसहकाऱ्याला बऱ्याच काळानंतर भेटल्यामुळे त्याच्याशी हातमिळवणी करता येणार नाही. थट्टा-मस्करी करताना एकमेकांना टाळी मारणे आता अशक्य आहे. प्रेक्षकांशिवाय सामने खेळण्याचा विचारच मनाला अस्वस्थ करतो. त्यामुळे एकंदर क्रिकेटचे भवितव्य कसे असेल, याविषयी माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत,’’असे ३१ वर्षीय कोहली म्हणाला.

‘‘सध्या तरी या सर्व गोष्टींची कल्पनाच करू शकतो. परंतु एकदा सरावाला सुरुवात झाल्यानंतर कालांतराने सवय होईल. करोनावर उपाय निघेपर्यंत कदाचित सर्व खेळाडूंना या नियमांद्वारेच खेळावे लागेल. त्यामुळे आगामी काळ प्रत्येक क्रीडापटूसाठी आव्हानात्मक असेल,’’ असेही कोहलीने सांगितले.

याव्यतिरिक्त २०१२च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध साकारलेली १८३ धावांची खेळी कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरली, अशी कबुली कोहलीने दिली. ‘‘त्या वेळी पाकिस्तानच्या संघात शाहीद आफ्रिदी, सईद अजमल, उमर गुल आणि वहाब रियाज यांसारखे एकापेक्षा एक मातब्बर गोलंदाज होते. पाकिस्तानने दिलेल्या ३३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरने आम्हाला सुरेख सुरुवात करून दिली. परंतु तो बाद झाल्यानंतर मी सामन्याची सूत्रे हाती घेतली. विशेषत: अजमल त्या वेळी भन्नाट फॉर्मात होता. परंतु मी त्याला लेगस्पिनर समजून खेळलो आणि त्याच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. माझ्या १८३ धावांच्या खेळीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याा संघाने विजय मिळवला, ही गोष्ट माझ्यासाठी सुखावणारी होती. त्या खेळीनंतर माझ्या प्रगतीचा आलेख उंचावला म्हणून ती खेळी मला नेहमीच स्मरणात राहिल,’’ असे कोहलीने सांगितले.

दरम्यान ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय अद्याप बाकी असतानाही कोहलीने त्याविषयी मत व्यक्त करणे टाळले.

कर्णधारपदाच्या वाटचालीत धोनीचे मोलाचे योगदान!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे मला कर्णधार बनवण्यापासून ते गेल्या काही वर्षांच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत यशाची शिखरे सर करण्यापर्यंत फार मोलाचे योगदान आहे, असे कोहली म्हणाला. ‘‘ज्या वेळी मी पहिल्यांदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले, त्या वेळेपासूनच मी धोनीच्या पाठीशी असायचो. प्रत्येक गोष्टीत त्याचा सल्ला घेण्याची मला सवय झाली होती. त्याचप्रमाणे संघहितासाठी नवनवीन कल्पना मी सातत्याने त्याला सांगायचो. कदाचित यामुळेच धोनीला माझ्यात भावी कर्णधार आढळला असेल,’’ असे कोहलीने सांगितले.

कोहलीमध्ये सचिनच्या फलंदाजीची झलक -गोल्ड

नवी दिल्ली : विराट कोहलीच्या फलंदाजीत मला भारताचाच महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीची झलक दिसते, अशी प्रतिक्रिया पंच इयान गोल्ड यांनी व्यक्त केली. ‘‘कोहलीची फलंदाजी पाहताना मला फार आनंद मिळतो. एकेकाळी सचिन माझा आवडता फलंदाज होता. कोहलीमध्ये मला सचिनची झलक दिसते. दोघांचीही कव्हर ड्राइव्ह लगावण्याची शैली जवळपास सारखी आहे. तसेच सचिनप्रमाणे कोहलीच्या खांद्यावरही कोटय़वधी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे असते आणि तो नेहमी चाहत्यांची मने जिंकतो,’’ असे गोल्ड म्हणाले.