मलेशियात होणाऱ्या अझलन शाह निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी दानिश मुज्तबाकडे सोपवण्यात आले आहे. ६ ते १७ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
हॉकी इंडियाच्या निवड समितीचे सदस्य सय्यद अली, मुख्य प्रशिक्षक मायकेल नॉब्स आणि अनुभवी फिजिओलॉजिस्ट जेसन कोनराथ यांच्यासह सरकारी निरीक्षक हरबिंदर सिंग यांनी १८ सदस्यीय संघाची आणि आठ राखीव खेळाडूंची निवड केली. सध्या सुरू असलेल्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीद्वारे ही निवड करण्यात आली आहे.
हॉकी इंडिया लीग स्पर्धेत सर्वाधिक गोल झळकावणाऱ्या संदीप सिंगला या संघात राखीव खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. अझलन शाह हॉकी स्पर्धेत गोलरक्षक पी. आर. श्रीजेशकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संघात आठ आघाडीवीर, पाच मधल्या फळीतील आणि तीन बचावपटूंचा समावेश आहे.
भारतीय हॉकी संघ : गोलकीपर- पी. आर. श्रीजेश, सुशांत तिर्की. बचावपटू- रुपिंदरपाल सिंग, हरबीर सिंग, गुरजिंदर सिंग. मधली फळी- अमित रोहिदास, गुरमेल सिंग, मनप्रीत सिंग, कोथाजित सिंग खंडंगबाम, एम. बी. अयप्पा, आघाडीवीर- दानिश मुज्तबा (कर्णधार), नितीन थिमय्या, सतबीर सिंग, मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, चिंगलेनसना सिंग कांगजुम, धर्मवीर सिंग, गुरविंदर सिंग चंडी. राखीव- केशव दत्त, संदीप सिंग, परदीप मोर, सुरेंदर कुमार, मलक सिंग, इम्रान खान, अमोन मिराश तिर्की, सिद्दार्थ शंकर.