थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा

भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालला गुरुवारी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतने दुखापतीमुळे माघार घेतली, तर दुहेरीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचाही पराभव झाल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

३० वर्षीय सायनाने थायंलडच्या बुस्नान ओंगबॅमरंगफानला दुसऱ्या फेरीच्या लढतीत कडवी झुंज दिली. परंतु जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या बुस्नानने सायनावर २१-२३, २१-१४, २१-१६ असा तीन गेममध्ये विजय मिळवला. हा सामना एक तास आणि आठ मिनिटांपर्यंत लांबला. बुस्नानचा हा सायनाविरुद्ध सलग चौथा विजय ठरला. भारताची आणखी एक खेळाडू पी. व्ही. सिंधूला स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले होते.

श्रीकांतने खेळण्यासाठी न उतरताच पायाच्या दुखापतीमुळे माघार घेतली. श्रीकांतच्या उजव्या पायाच्या पोटरीचे स्नायू ताणले गेल्यामुळे त्याचा मलेशियन प्रतिस्पर्धी ली झि जिआला पुढे चाल देण्यात आली.

पुरुष दुहेरीत भारताला सात्त्विक-चिराग या जोडीकडून फार अपेक्षा होती. परंतु दुसऱ्या फेरीत त्यांनाही इंडोनेशियाच्या दुसऱ्या मानांकित जोडीकडून हार पत्करावी लागली. मोहम्मद अहसान आणि हेंड्रा आणि सेतिवान यांनी सात्त्विक-चिरागला २१-१९, २१-१७ असे सरळ दोन गेममध्ये नेस्तनाबूत केले.

मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पाच्या साथीने खेळणारा सात्त्विक यांच्यावर भारताचे आव्हान टिकवून ठेवण्याची आशा होती. परंतु हाँगकाँगच्या चांग टक चिंग आणि विंग यंग यांनी या भारतीय जोडीला २१-१२, २१-१७ अशी धूळ चारून त्यांच्यासह भारताचेही आव्हान संपुष्टात आणले.

पहिल्या गेममध्ये आम्ही १९-१८ असे एका गुणाने आघाडीवर होतो. परंतु मोक्याच्या क्षणी आम्ही क्षुल्लक चुका केल्या. बऱ्याच कालावधीनंतर देशाचे प्रतिनिधित्व केल्यामुळे मी समाधानी आहे. आता पुढील आठवडय़ात होणाऱ्या थायंलड १००० सुपर बॅडमिंटन स्पर्धेत आम्ही चमकदार कामगिरी करू.

-चिराग शेट्टी