भारतीय संघाचा फलंदाज आणि सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणारा अंबाती रायुडू बाबा बनला आहे. रविवारी अंबातीच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या ट्विटर हँडलवरुन ही गोड बातमी दिली आहे.

१४ फेब्रुवारी २००९ रोजी अंबाती आणि चेन्नुपली विद्या यांचं लग्न झालं. अंबातीची पत्नी फारशी सोशल मीडिया किंवा कॅमेऱ्यासमोर येत नाही. आयपीएल सामन्यांमध्येही अंबातीची पत्नी फार कमी वेळा दिसायची. २०१९ विश्वचषकात अंबाती रायुडू भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार होता. परंतू एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने रायुडूला वगळून विजय शंकरला संधी दिली. यानंतर नाराज झालेल्या रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. मात्र सिनीअर खेळाडूंनी समजूत काढल्यानंतर रायुडूने आपली निवृत्ती मागे घेतली होती.

आतापर्यंत रायुडूने ५५ वन-डे सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ज्यात त्याच्या नावावर १६९४ धावा जमा आहेत. २०१४ ते २०१६ या काळात रायुडू फक्त ६ टी-२० सामने खेळला आहे.