गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षात तेलंगणमधील कर्नल संतोष बाबू (३७) यांच्यासह २० भारतीय जवानांना वीरमरण आले. खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या भारत-चीन संघर्षात भारताचे १७ जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर १७ असे २० जवान शहीद झाले. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या या संघर्षात भारतीय लष्करात शिपाई या पदावर कार्यरत असणारे कुंदन कुमार यांनीही आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाला साऱ्यांनीच सलाम केला. कुंदन कुमार यांच्या वडिलांनी बिहारमध्ये त्यांच्या वीरपुत्राच्या बलिदानाबाबत प्रतिक्रीया दिली. १५-१६ जूनला चीनशी झालेल्या संघर्षात माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिले याचा मला अभिमान आहे. मला दोन नातू आहेत, त्यांनादेखील मी सैन्यात भरती होण्यासाठी पाठवणार आहे, असे कुंदन कुमार यांचे वडिल म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेवर भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने त्यांना कडक सलाम ठोकला. “माणसाच्या रूपात देव कसा असतो ते पाहा”, असे ट्विट सेहवागने कुंदन कुमार यांच्या वडिलांना उद्देशून केले. तसेच, “चीनला आता लवकरच लढा शिकवला जाईल”, असेही सेहवागने नमूद केले.

या आधी, शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या मुलीचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शहिद वडिलांच्या फोटोसमोर उभी असलेली सहा वर्षांची चिमुकली पाहून प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यानंतर चीनबद्दल विरेंद्र सेहवागने आपला राग व्यक्त केला होता आणि शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली होती.