श्रीलंकेविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना ७ विकेट्सनी जिंकला
दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्ती यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७ विकेट्सनी विजय मिळवला. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या मातब्बर संघाला त्यांच्याच भूमीत ट्वेन्टी-२० मालिकेत चीतपट करणाऱ्या भारतीय संघाने तोच फॉर्म कायम राखत श्रीलंकेचा धुव्वा उडवला आणि निर्भेळ यश साकारले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र दीप्ती शर्माने भारतीय संघासाठी हा निर्णय सार्थ ठरवला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत दीप्तीने ४ बळी घेतले होते. फिरकीपटू दीप्तीने अवघ्या २० धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले. दीप्तीच्या भेदक कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने श्रीलंकेचा डाव ११२ धावांतच गुंडाळला. दिलानी मंडोडरा सुरंगिकाने सर्वाधिक २३ धावा केल्या. शिखा
पांडे, प्रीती बोस यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाची अवस्था २ बाद १८ अशी झाली. पूनम राऊत आणि स्मृती मंधाना झटपट तंबूत परतल्या. मात्र त्यानंतर वेदा कृष्णमुर्ती आणि दीप्ती शर्माने तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. २८ धावा करून दीप्ती बाद झाली. वेदाने शिखा पांडेला साथीला घेत लक्ष्य गाठले. तिने ८ चौकारांसह ६१ धावा केल्या. ६ बळी व २८ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ३८.२ षटकांत सर्वबाद ११२ (सुरंगिका २३; दीप्ती शर्मा ६/२३) पराभूत विरुद्ध भारत : २९.३ षटकांत ३ बाद ११४ (वेदा कृष्णमूर्ती ६१, दीप्ती शर्मा २८; सुगंदिका कुमारी १/१८)
सामनावीर : दीप्ती शर्मा