गाबाच्या मैदानात कधी पराभव बघितलेला नाही…गाबा स्टेडियममध्ये सलग २८ कसोटी सामने सहज जिंकलेत…अशाप्रकारच्या फुशारक्या मारणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला टीम इंडियाने जबरदस्त हादरा दिला आणि कांगारूंना चारीमुंड्या चित केलं.

क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी 328 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सनी दणदणीत पराभव केला. मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना जिंकून भारताने कसोटी मालिकाही 2-1 अशा फरकाने खिशात घातली. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे गाबाच्या मैदानावर आतापर्यंत 250 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य कोणत्याही संघाला गाठता आलं नव्हतं. 1951 मध्ये वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाविरोधात या मैदातान 236 धावांचं टारगेट पूर्ण केलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना गाबाच्या मैदानावरील ती सर्वोच्च धावसंख्या होती. त्यानंतर कोणताही संघ चौथ्या डावात 250 पेक्षा जास्त धावा काढू शकला नव्हता. पण भारतीय संघाने इतिहास घडवला आणि वेस्ट इंडिजचा 70 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला.

आणखी वाचा- WTC : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल स्थानावर

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताने कालच्या 4 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. टीम इंडियाला विजयासाठी 324 धावांची गरज होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात होते. पण वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने रोहित शर्माला 7 धावांवर बाद करत भारताला दिवसाच्या सुरूवातीलाच पहिला धक्का दिला. त्यावेळी गाबाची भीती खरे ठरते की काय असं सर्वांनाच वाटलं होतं. पण नंतर चेतेश्वर पुजार आणि गिल यांनी मैदानावर तंबू ठोकला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी (118) भागीदारी केली. गिलने कसोटीतील पहिले शतक झळकावण्याची संधी गमावली आणि तो 91 धावांवर बाद केले. गिलच्या जागी आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजारासोबत धावांचा वेग वाढवला. पण वेगाने खेळण्याच्या प्रयत्नात 22 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 24 धावा फटकावून रहाणे बाद झाला. पण तोपर्यंत भारत हा सामना अनिर्णित राखण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी खेळणार असल्याचा मेसेज ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचला होता. रहाणे बाद झाल्यानंतर ऋषभ पंतला मयांक अग्रवालच्या आधी मैदातात पाठवलं. आपल्यावरील विश्वास सार्थ ठेवत पंतने आक्रमक खेळी करत पुजारासह 61 धावांची भागीदारी केली. पण कसोटी करिअरमधील सर्वात धीम्या गतीने अर्धशतक फटकावल्यानंतर पुजारा बाद झाला. कमिन्सने पुजाराला 56 धावांवर बाद केले. नंतर पुजाराच्या जागी आलेल्या मयांक अग्रवालने पंतसह पाचव्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. पण कमिन्सनेच अग्रवालला 9 धावांवर बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. त्यानंतर पहिल्या डावातील हिरो वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी दुसऱ्या डावातही फलंदाजीतील चमक दाखवत पंतला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय दृष्टीक्षेपात आलेला असतानाच दोघं बाद झाले. अखेर 19 चेंडूंमध्ये तीन धावांची आवश्यकता असताना पंतने हेजलवूडच्या गोंदाजीवर चौकार मारुन भारताचा विजय निश्चित केला. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत कसोटी मालिकेवर नाव कोरलं. मराठीत ‘गर्वाचं घर खाली’ अशी म्हण आहे, पण हा ऐतिहासिक कसोटी सामना जिंकून भारताने कांगारुंचं ‘गाबा’चं घर खाली केलं असंच म्हणावं लागेल.