भारतीय खेळाडूंनी मिश्रदुहेरीत एक रौप्य व दोन कांस्यपदके निश्चित केली आणि राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत धडाकेबाज आगेकूच राखली.

भारताच्या सौम्यदीप घोष व मौमा दास यांनी द्वितीय मानांकित चेन फेंग व येई हेंगवेई यांच्यावर १३-११, ११-१, ११-६ अशी मात केली. या विजयासह त्यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्यांची आता अव्वल मानांकित लिन हुओ व झोऊ यिहान या सिंगापूरच्या जोडीशी गाठ पडणार आहे. सिंगापूरच्या या जोडीने भारताच्या अँथोनी अंमलराज व के.शामिनी यांना ११-३, ११-३, ११-९ असे हरविले. अंमलराज व शामिनी यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

उपांत्य फेरीतील अन्य लढतीत जी.साथियन व अंकिता दास या भारतीय जोडीची आपलेच सहकारी सानिल शेट्टी व मनिका बात्रा यांच्याशी गाठ पडणार आहे. त्यामुळे भारताचे एक रौप्य व आणखी एक कांस्यपदक निश्चित झाले आहे. साथियन व अंकिता यांनी तृतीय मानांकित डेव्हिड मॅकबीथ व करिना लेफेव्रे यांच्यावर ११-४, ९-११, ११-२, ११-५ अशी सनसनाटी मात केली. सानिल व मनिका यांनी सिंगापूरच्या चेवु युओ चेई व लिन येई यांचे आव्हान ११-९, ११-२, ११-९ असे संपुष्टात आणले.