मणिपूरची उदयोन्मुख खेळाडू नुंगशितॉन चानूने महापौर चषक राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेतील कुमार मुली व युवती या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन सुवर्णपदके जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले. अरुणाचल प्रदेशच्या लालू टाकूने भारताचे प्रतिनिधित्व करताना युवा मुलांच्या विभागात सोनेरी कामगिरी केली.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत चानूने ५८ किलो वजनी गटातील युवा व कुमार मुली या दोन्ही विभागांत स्नॅच (७२ किलो), क्लीन व जर्क (८५ किलो) तसेच एकूण १८५ किलो वजन उचलून उल्लेखनीय यश मिळविले. युवा मुलींमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेयर्स रिनॉल्डने तिन्ही प्रकारांत रौप्यपदक मिळवले. कुमार मुलींमध्ये इंग्लंडच्या शेपार्ड अंबेरने तिन्ही रौप्यपदके मिळवली, तर रिनॉल्डला तीन कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले.

युवा मुलींच्या ५३ किलो गटात भारताच्या प्रमिला क्रिसानीने स्नॅच (८० किलो), क्लीन व जर्क (१०९ किलो) तसेच एकूण १८९ किलो वजन उचलून तिहेरी विजेतेपद मिळवले. याच वजनी गटात भारताच्या मत्सा संताशीने स्नॅच (८२ किलो), क्लीन व जर्क (१०८ किलो) तसेच एकूण (१९० किलो) अशी तीन सुवर्णपदके जिंकली.

युवा मुलांच्या ६९ किलो गटात लालूने स्नॅच (१२५ किलो), क्लीन व जर्क (१५७ किलो) तसेच एकूण (२८२ किलो) अशी तिन्ही विजेतेपदे मिळवली. त्याने जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. दीपक लाथेरने ६२ किलो वजनी गटात स्नॅच (१२० किलो), क्लीन व जर्क (१४९ किलो) तसेच एकूण (२६१ किलो) अशी कामगिरी करीत प्रथम स्थान मिळवले. वरिष्ठ पुरुष व कुमार मुले या दोन्ही विभागांतही त्यालाच तिन्ही प्रकारांचे विजेतेपद देण्यात आले.
महिलांच्या वरिष्ठ विभागात मिनाती सेठी या भारतीय खेळाडूला ५८ किलो गटात स्नॅच (८४ किलो), क्लीन व जर्क (११० किलो) तसेच एकूण (१९४ किलो) या तिन्ही प्रकारांत कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले.