वृत्तसंस्था, मँचेस्टर

ओल्ड ट्रॅफर्डच्या रणभूमीवर पाऊस विरामासह साडेअठ्ठावीस तास आशा-आकांक्षा जिवंत राखल्यानंतर भारत विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतून बाद झाला.

गेले एकेचाळीस दिवस विश्वचषकाच्या वातावरणात क्रिकेटमय झालेल्या देशवासीयांचा जीव बुधवारी महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा खेळपट्टीवर शतकी भागीदारीसह टिकून असेपर्यंत टांगलेला होता.  ६ बाद ९२ अशा कठीण स्थितीतून जडेजा आणि धोनी यांची विजयाकडे वाटचाल सुरू होती. मात्र जडेजा झेलबाद झाल्यानंतर ती थांबली. तर निर्णायक क्षणी धोनी मार्टिन गप्टिलच्या थेट फेकीमुळे धावचीत झाला आणि भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. दोन दिवसांची ही हातघाईची लढाई १८ धावांनी गमावल्यामुळे देशभरात निराशा पसरली.

न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना भारत आरामात जिंकून अंतिम फेरी गाठेल, या क्रिकेटरसिकांच्या अपेक्षा फोल ठरल्या. मंगळवारी पावसामुळे अर्धवट राहिलेला उर्वरित सामना बुधवारी नियोजित वेळेत पुन्हा सुरू झाला. न्यूझीलंडने भारतापुढे ५० षटकांत २४० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पेलताना रोहित शर्मा (१), विराट कोहली (१) आणि लोकेश राहुल (१) यांनी हाराकिरी पत्करल्यामुळे भारताची ३ बाद ५ धावा अशी दयनीय अवस्था झाली. परंतु महत्त्वाचे फलंदाज माघारी परतल्यानंतर जडेजाने हिमतीने किल्ला लढवला आणि ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभारत भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. त्याला अनुभवी धोनीने सुरेख साथ दिली.

परंतु भारताला १३ चेंडूंत ३३ धावा हव्या असताना जडेजा बाद झाला. मग ४९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धोनी बाद झाला आणि मग तळाच्या फलंदाजांना विजयाचे लक्ष्य पेलण्यात अपयश आले.