वेस्ट इंडिजची पुन्हा शरणागती; जडेजा विजयाचा शिल्पकार, कोहली मालिकावीर

फलंदाजीची मधली फळी आणि गोलंदाजांचा समतोल यांच्यासह अष्टपैलू खेळाडूंना योग्य स्थान देत भारताने अचूक संघबांधणी केल्यानंतर त्याचे अनुकूल निकाल सलग दुसऱ्या सामन्यात पाहायला मिळाले. पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने सपशेल शरणागती पत्करल्यामुळे भारताने नऊ गडी राखून विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेवर ३-१ असे वर्चस्व मिळवले. भारताने मायदेशात सलग सहावी मालिका जिंकण्याची किमया साधली.

डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने चार बळी घेतल्यामुळे भारताने वेस्ट इंडिजचा डाव ३१.५ षटकांत १०४ धावांत गुंडाळला. वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.

गोलंदाजांनी विजयाचा पाया रचल्यानंतर फलंदाजांनी अजिबात वेळ न दवडता १०५ धावांचे लक्ष्य गाठले. विंडीजचे तुटपुंजे आव्हान पार करण्यासाठी भारताला फक्त १४.५ षटके पुरेशी ठरली. शिखर धवन पुन्हा अपयशी ठरल्यानंतर रोहित शर्मा (५४ चेंडूंत ६२ धावा) आणि कर्णधार विराट कोहली (२९ चेंडूंत ३३ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ९९ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली.

कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर एकदिवसीय क्रिकेट मालिकेत सुरुवातीला वेस्ट इंडिजने अप्रतिम प्रतिकार केला. विशाखापट्टणमची दुसरी लढत ‘टाय’ राखणाऱ्या विंडीजने मग पुण्यात शानदार विजय मिळवून मालिकेत चुरस निर्माण केली; परंतु उर्वरित दोन्ही सामन्यांत वेस्ट इंडिजच्या संघाने हाराकिरी पत्करली.

रोहित १८ धावांवर असताना ओशाने थॉमसच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक शाय होपने त्याला जीवदान दिले. मग त्याने पाच चौकार आणि चार षटकारांसह आपली खेळी साकारली. सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या रोहितने अर्धशतकी खेळी साकारताना चालू वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमधील एक हजार धावांचा टप्पा ओलांडला. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनशे षटकारांचा टप्पा गाठला.

त्याआधी, नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने फलंदाजी स्वीकारल्यानंतर सुरुवातीपासूनच हा संघ अडचणीत होता. सलामीवीर किरॉन पॉवेलला भोपळासुद्धा फोडता आला नाही. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर यष्टीपाठी महेंद्रसिंह धोनीने त्याचा अप्रतिम झेल टिपला. मग जसप्रीत बुमराने होपचा शून्यावर त्रिफळा उडवून विंडीजची २ बाद २ अशी केविलवाणी अवस्था केली. त्यानंतर विंडीजचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. अनुभवी मार्लन सॅम्युअल्सने २४ आणि होल्डरने २५ धावा केल्या.

आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये द्रविडचा समावेश

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा एकदिवसीय सामना सुरू होण्याआधी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे. बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारा द्रविड हा पाचवा भारतीय क्रिकेटपटू आहे. द्रविडने १६४ कसोटी सामन्यांत १३,२८८ धावा केल्या आहेत, तर ३४४ एकदिवसीय सामन्यांत १०,८८९ धावा केल्या आहेत. २००४ मध्ये त्याने आयसीसीचा वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटू हे पुरस्कार पटकावले होते.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज : ३१.५ षटकांत सर्व बाद १०३ (जेसन होल्डर २५; रवींद्र जडेजा ४/३३, जसप्रीत बुमरा २/११) पराभूत वि.

भारत : १४.५ षटकांत १ बाद १०५ (रोहित शर्मा नाबाद ६३, विराट कोहली नाबाद ३३; ओशाने थॉमस १/३३)

  • सामनावीर : रवींद्र जडेजा
  • मालिकावीर : विराट कोहली