25 May 2020

News Flash

विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा : भारताला विश्वविजेतेपद

अपंगांच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात इंग्लंडवर ३६ धावांनी मात

अपंगांच्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात इंग्लंडवर ३६ धावांनी मात

वूर्स्टर : रवींद्र संतेचे दमदार अर्धशतक आणि कुणाल फणसेच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने अपंगांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जगज्जेतेपद मिळवले. भारताने यजमान इंग्लंडला ३६ धावांनी पराभूत केले.

भारताने दिलेल्या १८१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकांत ९ बाद १४४ धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडने सलामीवीर जेमी गुडविन (१७) लवकर गमावले. सनी गोयतने त्याला बाद केले. परंतु अँगुस ब्राऊन (४४) आणि कॅलम फ्लीन (२८) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ६६ धावांची भागीदारी रचल्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली. मात्र सनीनेच ब्राऊनला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर कुणालने कर्णधार ईआन नैर्न (७) व लिआम थॉमस (१) यांना एकाच षटकात माघारी धाडल्यामुळे इंग्लंडची १ बाद ९० वरून ४ बाद ९९ धावा अशी अवस्था झाली.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना सावरण्याची संधीच दिली नाही. १२९ धावांवर नववा फलंदाज बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली. परंतु अखेरच्या जोडीने शेवटची २.२ षटके खेळून काढली. मात्र ते इंग्लंडचा पराभव टाळू शकले नाहीत.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ बाद १८० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. रवींद्रने ३४ चेंडूंत चार षटकार व दोन चौकारांच्या सहाय्याने ५३ धावा फटकावल्या. सलामीवीर कुणाल आणि कर्णधार विक्रांत केणी यांनीसुद्धा बहुमूल्य योगदान दिले. या दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी ६७ धावांची भागीदारी रचली. कुणाल (३६) सलग दुसरे अर्धशतक झळकावण्यात अपयशी ठरला, तर विक्रांत २९ धावांवर बाद झाला. मात्र सुग्नेश महेंद्रनने अवघ्या ११ चेंडूंत चार षटकारांसह धडाकेबाज ३३ धावा फटकावल्यामुळे भारताने पावणेदोनशे धावांचा टप्पा गाठला. इंग्लंडतर्फे लिआम ओ’ब्राएनने सर्वाधिक दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ७ बाद १८० (रवींद्र संते ५३, कुणाल फणसे ३६; लिआम ओ’ब्राएन २/३५) विजयी वि. इंग्लंड : २० षटकांत ९ बाद १४४ (अँगुस ब्राऊन ४४, कॅलम फ्लीन २८; कुणाल फणसे २/१५, सनी गोयत २/२३).

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2019 3:36 am

Web Title: india defeat england by 36 runs in physical disability world cricket 2019
Next Stories
1 भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका : भारत शिखर गाठेल, पण धवन..?
2 डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : त्रयस्थ ठिकाणासाठी खेळाडू आग्रही
3 द्रविडचे हितसंबंध नसल्याचे प्रशासकीय समितीचे स्पष्टीकरण
Just Now!
X