पदक मिळविण्याच्या आशा मावळल्यानंतर भारतीय संघ अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत शेवटचा सामनाजिंकून विजयी सांगता करण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी त्यांना यजमान मलेशियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
अव्वल साखळी पद्धतीच्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने आठ गुणांसह आघाडी घेतली आहे आणि अंतिम लढतीत पात्र होण्यासाठी त्यांना न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या लढतीत केवळ बरोबरीची आवश्यकता आहे. न्यूझीलंडचे सहा गुण झाले असून त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी कांगारूंविरुद्ध विजय अनिवार्य आहे. मलेशियाचे आठ गुण असून भारताविरुद्धचा सामना बरोबरीत ठेवला तरी ते अंतिम फेरीत स्थान मिळवू शकणार आहेत. भारताचे तीन गुण आहेत.
भारताचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांनी सांगितले, ‘‘संघाला पदक मिळविता येणार नसले तरी संघाच्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. आमच्या संघात दहा युवा खेळाडूंचा अधिकाधिक समावेश आहे ही गोष्ट लक्षात घेता आमच्या खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात जिद्दीने खेळ केला आहे. पाकिस्तानविरुद्ध ज्या जिद्दीने आमच्या खेळाडूंनी खेळ केला होता, तसा खेळ ते न्यूझीलंडविरुद्ध दाखवू शकले नाहीत. तथापि आमच्या खेळाडूंनी येथे बरेच काही तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा उपयोग त्यांना युवा विश्वचषक स्पर्धेसाठी होणार आहे. मलेशियाविरुद्ध आमचे खेळाडू सकारात्मक वृत्तीने खेळणार आहेत. शेवटपर्यंत सामना जिंकण्याचाच आमचा निर्धार आहे.’’
मलेशियाचे प्रशिक्षक पॉल रेविंगॉन म्हणाले, ‘‘विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळविणे हेच आमचे ध्येय आहे. ऑगस्टमध्ये आशिया चषक स्पर्धा आमच्याकडेच होणार आहे तर जागतिक सीरिज स्पर्धाही आम्ही आयोजित करीत आहोत. या दोन्ही स्पर्धाच्या दृष्टीने भारताविरुद्धचा सामना आमच्याकरिता खरी कसोटीच ठरणार आहे. चॅम्पियन चॅलेंज वन स्पर्धेच्या वेळी आम्ही पोलंड, दक्षिण कोरिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका यांना आम्ही हरविले होते मात्र नंतर उपांत्य फेरीत आम्हास कोरियाविरुद्धच ३-६ असा पराभव स्वीकारावा लागला होता. येथे त्याची पुनरावृत्ती घडू नये हीच मी अपेक्षा करीत आहे. खेळातील सातत्य कायम ठेवावे असा सल्ला मी खेळाडूंना दिला आहे.’’