कानपूर कसोटी न्यूझीलंडविरुद्ध १९६ धावांनी विजय प्राप्त केलेल्या भारतीय संघाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. मात्र, हे अव्वल स्थान पाकिस्तानसोबत संयुक्तरित्या भारताला मिळाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाच्याही खात्यात पाकिस्तान इतकेच १११ गुण जमा झाले आहेत. समान गुणसंख्येमुळे भारत आणि पाकिस्तान कसोटी क्रमवारीत सध्या अव्वल स्थानावर आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले होते. नुकतेच आयसीसीकडून पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक याला कसोटी प्रतिष्ठित गदा प्रदान करण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तानच्या खात्यात प्रत्येकी १११ गुण आहेत. त्या खालोखाल १०८ गुणांसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा संघ दुसऱया स्थानावर आहे.

वाचा: …म्हणून भारतीय संघाला ५०० वी कसोटी जिंकता आली

भारतीय संघाने सोमवारी कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध १९६ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. रवींद्र जडेजा आणि आर.अश्विन भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. रवींद्र जडेजाने सामन्यात एका अर्धशतकासह सहा विकेट्स घेतल्या, तर अश्विनने दोन्ही डावात मिळून तब्बल १० विकेट्स घेतल्या. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी दोन्ही डावात शतकी भागीदारी रचून महत्त्वाचे योगदान दिले. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताने कसोटी खिशात टाकली. भारतीय संघाची ही ५०० वी कसोटी होती.