भारतासह सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या विळख्यातून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी लढतं आहे. भारताचा पारंपरिक शेजारी पाकिस्तानलाही करोनाचा चांगलाच फटका बसला आहे. .या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी माजी गोलंदाज शोएब अख्तरने परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर भारत-पाक यांच्यात ३ सामन्यांची मालिका खेळवण्याचा विचार मांडला होता. यातून मिळणारं उत्पन्न हे करोनाविरुद्ध लढ्यात दोन्ही देश वापरतील असाही पर्याय शोएब अख्तरने सुचवला होता. मात्र भारताला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार कपिल देव यांनी शोएबच्या या कल्पनेला पूर्णपणे विरोध केला आहे.

अवश्य वाचा – करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा, शोएब अख्तरने सुचवला पर्याय

“शोएबला त्याचं मत मांडण्याचा हक्क आहे, पण माझ्या मते आपल्याला पैशांची गरज नाही. आपल्याकडे पुरेसा पैसा आहे. सध्या सर्व सरकारी यंत्रणा या संकटाचा एकत्रितपणे कसा सामना करतात हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. सध्या बातम्यांमध्ये बऱ्याचदा राजकारण्यांवर टीका होताना दिसत आहे, हे थांबायला हवं. टीका करायची ही वेळ नाही. बीसीसीआयनेही करोनाविरुद्ध लढ्यात ५१ कोटींची मदत केली आहे, गरज पडल्यास बीसीसीआय आणखी दान देऊ शकतं. त्यामुळे आपल्याला पैसे उभे करण्याची गरज नाही. सध्याच्या घडीला परिस्थिती लवकर नियंत्रणात येईल असं वाटत नाही…त्यामुळे क्रिकेट मालिका आयोजित करुन खेळाडूंचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही.” कपिल देव पीटीआयशी बोलत होते.

अवश्य वाचा – आमच्यासाठी व्हेंटिलेटर बनवा, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही ! शोएब अख्तरची भारताला विनंती

कोणत्याही दृष्टीकोनातून ही मालिका खेळवणं सध्या योग्य नाही, आणि या ३ सामन्यांमधून तुम्ही असा कितीसा पैसा उभा करणार आहात?? माझ्यामते पुढचे ५-६ महिने आपण क्रिकेटचा विचारही करायला नको. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर क्रिकेट मालिका पुन्हा खेळवता येईल. पण सध्या खेळ हा देशापेक्षा मोठा होऊ शकत नाही. सध्या गरजू व्यक्ती, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस यांची काळजी घेणं हे आपलं काम आहे, कपिल देव यांनी आपलं मत मांडलं. बीसीसीआयने करोना विषाणूचा देशातला वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.