‘आयसीसी’ने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय जागतिक क्रमवारीत भारताची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांतील मालिका विजयांच्या कामगिरीवर ‘आयसीसी’ने ही नवी क्रमवारी जाहीर केली. त्यानुसार इंग्लंडला तब्बल ५ वर्षांनी क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले आहे. इंग्लंडने २०१४-१५ या वर्षात २५ पैकी केवळ ७ सामने जिंकत अतिशय खराब कामगिरी केली होती. मात्र, २०१५-१६ आणि २०१६-१७ या कालावधीत इंग्लंडच्या कामगिरीचा दर्जा उंचावला. त्यामुळे ८ गुणांची कमाई करत इंग्लंडने १२५ रेटिंग पॉईंट्ससह अव्वल स्थानी झेप घेतली.

ताज्या क्रमवारीत १ गुण गमावत भारताला १२२ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या द. आफ्रिकेला ४ गुणांचा फटका बसल्याने आफ्रिकेचा संघ ११७ वरून ११३ रेटिंग पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र, चौथ्या क्रमांकापासून पुढील क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. महत्वाचे म्हणजे, २०१९च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी आज जाहीर झालेल्या क्रमवारीतील पहिले १० संघ सहभागी होणार आहेत.

जुलै महिन्यात भारताचा संघ ३ टी२०, ३ एकदिवसीय आणि ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजय नोंदवून क्रमवारीत अव्वल स्थान परत मिळवण्याची भारताला संधी आहे.

ताज्या एकदिवसीय क्रमवारीनुसार,

१. इंग्लंड – १२५ गुण
२. भारत – १२२ गुण
३. द. आफ्रिका – ११३ गुण
४. न्यूझीलंड – ११२ गुण
५. ऑस्ट्रेलिया – १०४ गुण
६. पाकिस्तान – १०२ गुण
७. बांगलादेश – ९३ गुण
८. श्रीलंका – ७७ गुण
९. विंडिज – ६९ गुण
१०. अफगणिस्तान – ६३ गुण