न्यूझीलंडविरुद्ध ३-१ असा विजय मिळविल्यानंतर डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक प्लेऑफ गटात भारतापुढे चेक प्रजासत्ताकचे आव्हान असणार आहे. ही लढत सप्टेंबरमध्ये होणार असून त्यासाठी नवी दिल्ली व पुणे या दोन शहरांमध्ये चुरस आहे.
ही लढत १८ ते २० सप्टेंबरदरम्यान होणार आहे. चेक प्रजासत्ताक संघाला मार्चमध्ये झालेल्या पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्यांना प्लेऑफ गटात राहावे लागले. चेक संघात टॉमस बर्डीच, ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये दुहेरीत अनेक विजेतेपद मिळविणारा राडेक स्टेपानेक यांचा समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीत चेक संघास ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
भारतीय संघाचे प्रशिक्षक झिशान अली यांनी सांगितले की, ‘‘चेक संघाविरुद्ध आजपर्यंत तीन वेळा भारताची लढत झाली होती. तीनही वेळा भारताला पराभवास सामोरे जावे लागले होते. मात्र डेव्हिस चषक स्पर्धेतील सामन्यांचा अंदाज बांधणे कठीण असते, केव्हाही अनपेक्षित निकाल नोंदविले जाऊ शकतात. आम्हाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार आहे. मी संघातील खेळाडूंबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांना कोणती कोर्ट्स पाहिजेत याचा निर्णय घेण्यात येईल.’’
खेळाडूंकडून दिल्ली येथील कोर्ट्सला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी १९९७ मध्ये भारताची चेक संघाशी लढत झाली होती. त्या वेळी चेक संघाने ३-२ असा विजय मिळविला होता. १९२६ व १९८६ मध्येही भारतास त्यांच्याकडून हार मानावी लागली होती.
न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भाग घेतलेल्या भारतीय संघात कोणताही बदल केला जाण्याची शक्यता कमी आहे. लिअ‍ॅण्डर पेसने पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे या लढतीत भाग घेतला नव्हता.
संयोजनासाठी पुणे शहर उत्सुक
डेव्हिस चषकाची लढत पुण्यात आयोजित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने अखिल भारतीय टेनिस महासंघाला दिला आहे. शिवछत्रपती क्रीडानगरीतील अव्वल दर्जाच्या सुविधा तसेच त्याच्याजवळ असलेली पंचतारांकित हॉटेल्स आदी सुविधा उपलब्ध असल्यामुळे पुणे शहराने या लढतीची मागणी केली आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये पुण्यात या लढतीचे आयोजन करण्यात आलेले नाही. राज्य संघटनेने राज्य शासनाकडे तसेच काही अन्य प्रायोजकांकडे या लढतीसाठी सहकार्याची विनंती केली आहे. या लढतीसाठी साधारणपणे दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.