भारताच्या पुरुष संघाने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत गतविजेत्या अर्मेनियाला बरोबरीत रोखत ४१व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आठव्या फेरीअखेर सातव्या स्थानी झेप घेतली. भारतीय महिलांनी इंडोनेशियावर ३-१ असा विजय मिळवला.
ग्रँडमास्टर परिमार्जन नेगीने अव्वल पटावर खेळताना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या लेव्हॉन अरोनियनला बरोबरीत रोखले. एस. पी. सेतुरामन, कृष्णन शशिकिरण आणि बी. अधिबान या भारतीय ग्रँडमास्टर्सनी पुढे नेगीचा कित्ता गिरवत अर्मेनियाचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न जवळपास धुळीस मिळवले आहे. दुसऱ्या सामन्यात सेतुरामन सुरुवातीला धोकादायक स्थितीत होता, पण नंतर सुरेख कामगिरी करून त्याने गॅब्रियल सर्जिसियानला बरोबरीत रोखले. शशिकिरणने सर्जी मोव्हसेसियानविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. अधिबानने कोणतीही चूक न करता व्लादिमिर अकोपियानविरुद्ध बरोबरी स्वीकारली. चीनने अझरबैजानला हरवत १४ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. युक्रेन, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक, अझरबैजान आणि रोमानिया हे देश १३ गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. भारताने १२ गुणांसह सातवे स्थान पटकावले आहे. पुढील फेरीत भारताचा सामना अर्जेटिनाशी होणार आहे.
मेरी अ‍ॅम गोम्स आणि पद्मिनी राऊत यांनी विजय मिळवल्यामुळे भारतीय महिला संघाने इंडोनेशियावर ३-१ अशा फरकाने विजय साकारला. द्रोणावल्ली हरिकाने सुकंदर खारिस्माविरुद्ध तर तानिया सचदेवने मेडिना ऑलियाविरुद्ध बरोबरी पत्करली. त्यानंतर मेरी अ‍ॅन गोम्स हिने चेल्सी मोनिका इग्नेशियर सिहिटे हिला हरवत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पद्मिनीने उम्मी फिसाबिलिल्ला हिला पराभूत करून भारताला विजय मिळवून दिला.