नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) २०२६ मध्ये युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि २०३२ मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅश यांच्याकडे दावेदारी पेश केली.

दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या बॅश यांच्या पत्रकार परिषदेत नरिंदर बात्रा म्हणाले, ‘‘आम्ही तीन क्रीडा स्पर्धाच्या यजमानपदासाठी उत्सुक आहोत. २०२६चे युवा ऑलिम्पिक, २०३०च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०३२चे ऑलिम्पिक या स्पर्धाचे आयोजन भारतात  व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या स्पर्धाच्या संयोजनासाठी किती स्पर्धा आहे, ते लवकरच कळेल.’’

याबाबत बॅश म्हणाले, ‘‘भविष्यातील युवा आणि उन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाच्या यजमानपदासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन उत्सुक आहे, याची आम्ही नोंद घेत आहोत. त्यामुळे भारतातील क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल आणि अनेक युवकांना प्रेरणा मिळेल.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘अजून २०२२च्या युवा ऑलिम्पिकचे यजमानसुद्धा निश्चित झालेले नाहीत. मात्र त्यामुळे ही प्रक्रिया सुरू व्हायला अद्याप अवधी असल्यामुळे ‘थांबा आणि वाट पाहा’ हेच धोरण स्वीकारावे लागणार आहे.’’

भ्रष्टाचारमुक्त क्रीडा क्षेत्रासाठी वचनबद्ध -राठोड

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बॅश यांची भेट घेतली. यावेळी देशातील क्रीडा क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त राखण्यासाठी आपण बांधील आहोत, असे राठोड यांनी सांगितले.

आयओसीच्या शिष्टमंडळाने आशियाई ऑलिम्पिक परिषद आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या सदस्यांसह राठोड यांच्याशी एक तास चर्चा केली. खेळाचा प्रसार आणि विकास, उत्तम व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांशी संबंध हे या बैठकीचे प्रमुख विजय होते.