भारत-इंग्लंड क्रिकेट मालिका

पुण्याच्या गहुंजे  स्टेडियमवर शुक्रवारी ‘सूर्य’ तळपणार का, याची क्रिकेटजगतात मोठी उत्कंठा निर्माण झाली आहे. ३६० अंशांमध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या सूर्यकुमार यादवच्या एकदिवसीय पदार्पणाचीच ही उत्सुकता आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्याने सूर्यकुमारच्या एकदिवसीय पदार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट कारकीर्दीला झोकात प्रारंभ करणारा सूर्यकुमार या संधीचे कसे सोने करतो, याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अष्टपैलू कामगिरीसह ६६ धावांनी विजय मिळवला. एकदिवसीय क्रिकेटमधील गेल्या काही वर्षांतील सर्वोत्तम विजय असल्याचे कर्णधार विराट कोहलीने नमूद केले. या सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि अष्टपैलू कृणाल पंड्या यांनी छाप पाडली. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत प्रसिधने, तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलच्या अनुपस्थितीत कृणालने आपली भूमिका चोख बजावली.

रोहित खेळण्याची शक्यता

सलामीवीर शिखर धवनला गवसलेला सूर हे पहिल्या सामन्याचे फलित म्हणता येईल. ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतील पहिल्याच सामन्यात अपयशी ठरल्यामुळे धवनला उर्वरित दोन सामन्यांत वगळण्यात आले होते. परंतु एकदिवसीय मालिकेत मात्र ९८ धावांच्या खेळीसह दिमाखदार सलामी त्याने दिली आहे. सलामीवीर रोहित शर्माच्या कोपराला दुखापत झाली असली तरी तो दुसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त असेल, असे सांगण्यात येत आहे. रोहितला विश्रांती दिल्यास शुभमन गिल याला संधी मिळू शकेल, तर के. एल. राहुल मधल्या फळीत फलंदाजीला उतरेल. एकदिवसीय मालिकेसाठी राहुलकडेच यष्टिरक्षणाची जबाबदारी राहील, तर ऋषभ पंतचा फलंदाज म्हणून मधल्या फळीसाठी विचार होऊ शकेल.

कुलदीपऐवजी चहल?

पहिल्या सामन्यात ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव महागडा ठरला. त्याने नऊ षटकांत ६८ धावा दिल्या. त्यामुळे कुलदीपच्या जागी लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलचा संघात समावेश होऊ शकेल. भुवनेश्वर कुमार, कृष्णा आणि शार्दूल ठाकूर या वेगवान त्रिकुटाने १० पैकी ९ बळी मिळवत इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्यामुळे टी. नटराजन किंवा मोहम्मद सिराज यांना संधीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

५००० विराटला भारतामधील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत पाच हजार धावांचा टप्पा गाठणारा दुसरा फलंदाज होण्यासाठी ७९ धावांची आवश्यकता आहे. सचिन तेंडुलकरने ६९७६ धावा केल्या आहेत.

६०००एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी धवनला ९४ धावांची गरज आहे. हा टप्पा गाठणारा तो १०वा भारतीय फलंदाज ठरेल.

मॉर्गनची मालिकेतून माघार; लिव्हिंगस्टोनला संधी

मालिकेत बरोबरी साधून आव्हान जिवंत राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंग्लंडला धक्का बसला आहे. कर्णधार ईऑन मॉर्गनने दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे, तर फलंदाज सॅम बिलिंग्स दुसऱ्या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. परंतु तिसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्याची आशा आहे. मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळू शकेल. मॉर्गनच्या हाताला दुखापत झाली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून सलामीवीर जॉनी बेअरस्टो (६४ चेंडूंत ९४ धावा) आणि जेसन रॉय (४६) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. परंतु बेन स्टोक्स, जोस बटलर आणि मोईन अली यांचा समावेश असलेल्या मधल्या फळीकडून अपेक्षित धावा झाल्या नाहीत. इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारायची असेल किंवा पाठलाग करायचा असेल तर मधल्या फळीला खेळ उंचावायला हवा. आदिल रशीद आणि मोईन अली हे फिरकी गोलंदाजही भारतीय फलंदाजांना त्रस्त करण्यात अपयशी ठरले.

मी पुन्हा समर्थपणे येईन – श्रेयस

पुणे : पुन्हा समर्थपणे पुनरागमन करीन, असा दावा भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने गुरुवारी केला आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयसला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. याचप्रमाणे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगलाही (आयपीएल) मुकावे लागणार आहे. श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणार असून, त्यामुळे त्याला किमान चार महिने विश्रांती घ्यावी लागणार आहे. ‘‘जितका मोठा धक्का, तितके समर्थपणे पुनरागमन. मी लवकरच परतेन,’’ असे ‘ट्विट’ श्रेयसने केले आहे.

संघ

* भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, थंगरासू नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, प्रसिध कृष्णा.

* इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टिरक्षक), मोईन अली, सॅम करन, टॉम करन, लिआम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, रीसी टॉप्ले, मार्क वूड.

* वेळ : दुपारी १.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,  स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्या.