इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात रोहितच्या फलंदाजीकडे लक्ष

जागतिक क्रमवारीत आघाडीच्या दोन संघांत समावेश असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत चाहत्यांना धावांचा पाऊस पाहायला मिळाला. भारताच्या दृष्टीने अन्य फलंदाज योगदान देत असले, तरी अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा आपल्या धडाकेबाज फटकेबाजीच्या बळावर संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे रविवारी होणाऱ्या निर्णायक तिसऱ्या लढतीत यजमान भारतीय संघ मालिकाविजयाची धुळवड साजरी करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

साधारणपणे ४० व्या षटकांपर्यंत गडी शिल्लक राखून अखेरच्या १० षटकांत फलंदाजी करणे, असे धोरण भारतीय संघ अवलंबतो. परंतु दुसऱ्या लढतीत ३३६ धावांचे लक्ष्य उभारूनही भारताला पराभव पत्करावा लागला. जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे इंग्लंडला मालिकेत १-१ अशी बरोबरी साधता आली. इंग्लंडच्या फलंदाजांपुढे ३५० धावांचे आव्हानही कमी पडत असल्याने गोलंदाजीत बदल करण्याबरोबरच भारताला सुरुवातीपासूनच फलंदाजीचा आक्रमक पावित्राही स्वीकारावा लागेल.

काही आठवड्यांपूर्वीच निर्णायक पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहितने ३२ चेंडूंत ६४ धावांची खेळी साकारली होती. एकदिवसीय मालिकेत रोहितला (२८ आणि २५) आतापर्यंत चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलता आला नाही. परंतु मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात तो पटाईत आहे. विशेषत: भारताला ३५० धावांपलीकडे नेण्यात रोहितचे योगदान मोलाचे ठरू शकते. त्यामुळे होळीच्या दिवशी चाहत्यांना मनोरंजनाची पर्वणी देण्यात रोहित यशस्वी ठरणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

भारताचे फलंदाज सर्वोत्तम लयीत

भारताचे आघाडीचे पाचही फलंदाज पूर्ण लयीत आहेत. कर्णधार विराट कोहलीने सलग दोन अर्धशतके झळकावली असून के. एल. राहुल आणि शिखर धवन यांनी प्रत्येकी एक शतक साकारले आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतनेही गेल्या लढतीत तुफानी खेळी साकारून पाचवा क्रमांक सुनिश्चित केला. त्यामुळे मुंबईकर सूर्यकुमार यादवला एकदिवसीय कारकीर्दीतील पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गोलंदाजांवर अतिरिक्त दडपण

पुण्यातील खेळपट्ट्या फलंदाजांना पोषक आहेत. तसेच इंग्लंडच्या संघात एकापेक्षाएक धडाकेबाज फलंदाजांचा समावेश असल्याने एकदिवसीय मालिकेत भारतीय गोलंदाजांवर अतिरिक्त दडपण असेल. त्यातच हार्दिक पंड्या फक्त फलंदाज म्हणून खेळत असल्याने भारताला पाच गोलंदाजांच्या पर्यायासह खेळावे लागत आहे. त्यामुळे कुलदीप यादव किंवा कृणाल पंड्या यांपैकी एकाला वगळून यजुर्वेंद्र चहलचा समावेश पक्का मानला जात आहे. सहाव्या गोलंदाजीच्या पर्यायासाठी कोहली एखादा फलंदाज कमी खेळवण्याचा धाडसी निर्णय घेणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

जेसन-जॉनीपासून सावधान

सलग दोन सामन्यांत शतकी भागीदारी नोंदवणाऱ्या इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो या सलामी जोडीपासून भारताला सावध राहावे लागणार आहे. बेअरस्टोने गेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे ९४ आणि १२४ धावा फटकावल्या आहेत. कर्णधार ईऑन मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलरवरील जबाबदारी वाढली आहे. परंतु तो एकदिवसीय मालिकेत अद्याप अपेक्षित योगदान देऊ शकलेला नाही. परंतु वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या गोलंदाजांवरील दडपणात वाढ झाली आहे. दोन्ही सामन्यांत भारतीय फलंदाजांनी त्यांच्याविरुद्ध ३००हून अधिक धावा फटकावल्या. त्यामुळे टॉम करन अथवा रीसी टॉप्लेऐवजी मार्क वूडला संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मोईन अली व आदिल रशीद फिरकीपटूची भूमिका बजावतील.

बेअरस्टोचे गावस्करांना प्रत्युत्तर

इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांना चोख प्रत्यत्तर दिले आहे. भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांतील चार डावांपैकी तीन वेळा बेअरस्टो शून्यावर बाद झाला. त्यामुळे गावस्करांनी बेअरस्टोच्या दृष्टीकोनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच त्याला संघातून वगळण्याचेही त्यांनी सुचवले. ‘‘एकदिवसीय मालिकेतील माझ्या कामगिरीनंतर गावस्करांना त्यांचे उत्तर मिळाले असेल, अशी आशा करतो. कसोटी मालिकेतील आव्हाने वेगळी होती. त्यामुळे खेळपट्टीवर जम बसवण्यापूर्वीच मी अनेकदा बाद झालो. मात्र मर्यादित षटकांच्या सामन्यात सलामीला फलंदाजी करण्याची मला सवय असल्याने त्वरित सूर गवसला,’’ असे बेअरस्टो म्हणाला.

१ – रोहित शर्माने एकदिवसीय कारकीर्दीत २९ शतके झळकावली असून ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या ३० शतकाची बरोबरी साधण्यासाठी त्याला एका शतकाची आवश्यकता आहे.

१३ – विराट कोहलीला (४९८७) मायदेशातील एकदिवसीय सामन्यांत ५,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी १३ धावांची गरज आहे. सचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरू शकेल.

१०३ – भारत-इंग्लंड यांच्यातील हा सामना क्रमांक १०३ असून आतापर्यंत भारताने ५४, इंग्लंडने ४३ सामने जिंकले आहेत. दोन सामने बरोबरीत सुटले आहेत, तर तीन सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, लिआम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशिद, रीसी टॉप्ले, मार्क वूड, जेक बॉल, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान.

 भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, थंगरासू नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध  कृष्णा.

वेळ : दुपारी १.३० वा. ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)