स्पॉट-फिक्सिंग, सट्टेबाजी आणि त्यानंतर क्रिकेटधुरिणांचे राजकारण यामुळे भारतीय क्रिकेटची प्रतिमा गेले काही दिवस डागाळली होती. पण इंग्लिश भूमीवर भारतीय संघाने ‘छोडो कल की बाते..’ या आविर्भावात आपल्या अश्वमेधाची घोडदौड सुरू केली. पाहता पाहता दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंका अशी दिग्गज राष्ट्रे नतमस्तक झाली. आता भारतीय संघ जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजविणाऱ्या सलग दुसऱ्या जेतेपदाच्या उंबरठय़ावर आहे. ‘ध्वज विजयाचा उंच धरा रे..’ हे ब्रीदवाक्य जपत भारतीय संघ रविवारी यजमान इंग्लंडशी आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत झुंजणार आहे.
२००७ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपद आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वविजेतेपद जिंकून देणारा यशस्वी सेनानी महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे क्रिकेटचा जन्मदाता इंग्लिश संघ एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्यावहिल्या वैश्विक विजेतेपदासाठी आसुसला आहे.
२००२ मध्ये पावसाने ‘खो’ घातल्यामुळे भारताला श्रीलंकेसोबत चॅम्पियन्स करंडकाच्या संयुक्त विजेत्याचा मान मिळाला होता. सध्या भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविजेता आहे, याचप्रमाणे आयसीसीच्या ताज्या जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान त्यांच्याकडे आहे. परंतु प्रत्यक्ष सामन्यात या गोष्टींना फारसा अर्थ नसतो. मैदानी कौशल्य आणि मानसिक सामथ्र्य ज्याचे श्रेष्ठ, त्याच्याकडे विजयश्री येते.
गेल्या दोन दशकांचा इतिहास इंग्लंडसाठी मुळीच अनुकूल नाही. विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडकाच्या विजेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली आहे. पण घरच्या वातावरणाचा फायदा घेत इंग्लिश संघ भारताच्या वादळी कामगिरीला थोपवू शकतो. भारतीय संघाने रुबाबात अंतिम फेरीपर्यंत वाटचाल केली आहे, तर इंग्लंड संघाने एकेक सामन्यात झगडून इथपर्यंत प्रवास केला आहे.
जून हा महिना भारतीय संघासाठी इंग्लंडमध्ये नेहमीच फलदायी ठरत आल्याचे इतिहास सांगतो. चॅम्पियन्स करंडकाच्या दोन्ही सामन्यांत भारत इंग्लंडविरुद्ध हरलेला नाही. २५ जून या सुवर्णदिनी भारतीय संघाने लॉर्ड्सवर प्रथमच जगज्जेतेपदाला गवसणी घालण्याची किमया साधली होती. येत्या मंगळवारी त्या ऐतिहासिक घटनेला ३० वष्रे पूर्ण होत आहे. रविवारी भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातल्यास हा आनंद आणखी द्विगुणीत होईल.
* धडाकेबाज धवन!
भारतीय फलंदाजी बेफाम फॉर्मात आहे. भारताच्या फलंदाजीची प्रामुख्याने मदार आहे ती धडाकेबाज धवनवर. या डावखुऱ्या फलंदाजाने या स्पध्रेतील चार डावांमध्ये दोन अर्धशतकांसह सर्वाधिक ३३२ धावा केल्या आहेत. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही नवी सलामीची जोडी प्रत्येक सामन्यात धावांचे इमले बांधत आहे. त्याच पायावर भारताच्या धावांचे शिखर उभे राहात आहे. पहिल्या १०-१२ षटकांमध्ये ही सलामीची जोडी जिद्दीने तग धरून पायाभरणी करीत आहे. भारताच्या मधल्या फळीला फारशी संधी या सामन्यात मिळाली नसली तरी सुरेश रैना आणि धोनी या अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील फलंदाजांकडे कठीण परिस्थिती हाताळण्याचा चांगला अनुभव गाठीशी आहे.
ल्ल  इशांत, भुवी आणि जडेजावर गोलंदाजीची मदार
गोलंदाजीच्या विभागात इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा हे तिघे जण इंग्लिश खेळपट्टीचा उत्तम फायदा घेत आहेत. रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव हेसुद्धा आपले काम चोख बजावत आहेत. गुरुवारी कार्डिफ येथे भारताने श्रीलंकेचा आठ विकेट्स राखून पराभव केला आणि अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. शुक्रवारी दुपारी भारतीय संघ बर्मिगहॅमला दाखल झाला.
*  ट्रॉट ठरणार कर्दनकाळ
इंग्लंडची आघाडीची फळी समर्थपणे फलंदाजी करीत आहे. तिसऱ्या क्रमांकावर जोनाथन ट्रॉट सातत्यपूर्ण फलंदाजीचे दर्शन घडवत आहे. चॅम्पियन्स करंडकाच्या फलंदाजांच्या यादीत ट्रॉट तिसऱ्या स्थानावर आहे. वॉर्विकशायरकडून खेळणाऱ्या ट्रॉटने एजबस्टनवर विशेष खेळी साकारण्याचा निर्धार केला आहे.
ट्रॉट म्हणतो, ‘‘२००४ नंतर दुसऱ्यांदा चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत मजल मारून इंग्लंड संघाने अनेक व्यक्तींना चुकीचे ठरवले आहे. २०१०मध्ये याच इंग्लिश संघाचे ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदाची अंतिम फेरी गाठली होती. बार्बाडोस येथे परंपरागत प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला धूळ चारून त्यांनी प्रथमच आयसीसीचे जागतिक जेतेपद काबीज केले होते.’’
*  वेगवान त्रिकूट इंग्लंडचे बलस्थान
वेगवान गोलंदाजी हे इंग्लंडचे बलस्थान आहे. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि स्टीव्हन फिन या त्रिकुटापुढे खेळणे भारतीय फलंदाजांसाठी आव्हानात्मक असेल. एजबस्टनची खेळपट्टी आणि नाणेफेक अंतिम सामन्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. याचप्रमाणे पावसाळी वातावरण आणि ओलसर खेळपट्टय़ा इंग्लिश गोलंदाजांसाठी नंदनवन ठरू शकतात. पहिल्या काही षटकांमध्येच प्रतिस्पर्धी संघाची आघाडीची फळी नामोहरम करण्यात इंग्लंडचे वेगवान गोलंदाज वाकबगार आहेत.
भारताची वाटचाल            
प्रतिस्पर्धी संघ    निकाल    
साखळी    
दक्षिण आफ्रिका    २६ धावांनी विजयी    
वेस्ट इंडिज          ८ विकेट्सनी विजयी    
पाकिस्तान          ८ विकेट्सनी विजयी    
उपांत्य फेरी
श्रीलंका                ८ विकेट्सनी विजयी
इंग्लंडची वाटचाल
प्रतिस्पर्धी संघ    निकाल
साखळी    
ऑस्ट्रेलिया          ४८ धावांनी विजयी
श्रीलंका                ७ विकेट्सनी पराभूत
न्यूझीलंड          १० धावांनी विजयी
उपांत्य फेरी
दक्षिण आफ्रिका    ७ विकेट्सनी विजयी

दृष्टिक्षेप चॅम्पियन्स करंडक स्पध्रेवर
वर्ष    विजेता    उपविजेता    यजमान
१९९८    दक्षिण आफ्रिका    वेस्ट इंडिज    बांगलादेश
२०००    न्यूझीलंड    भारत    केनिया
२००२    भारत-श्रीलंका (संयुक्तपणे)    श्रीलंका
२००४    वेस्ट इंडिज    इंग्लंड    इंग्लंड
२००६    ऑस्ट्रेलिया    वेस्ट इंडिज    भारत
२००९    ऑस्ट्रेलिया    न्यूझीलंड     द.आफ्रिका
२०१३    –    –    इंग्लंड    

“इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी विशेष रणनीती आखली नसून पूर्वीच्याच जोशाने खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत. इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेतल्यामुळेच आमची गोलंदाजीतील कामगिरी चांगली होत आहे. सामन्याच्या पहिल्या १० षटकांतील खेळ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इंग्लंडच्या वेगवान माऱ्याला तोंड देताना भारताच्या अव्वल फलंदाजांची कसोटी लागणार आहे. पण आमची आघाडीची फळी फॉर्मात आहे, ही जमेची बाजू आहे.”
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार
“भारत हा बलाढय़ संघ असून ते स्पर्धेत अपराजित आहेत. भारताचे आघाडीचे फलंदाज व गोलंदाज फॉर्मात आहेत. त्यामुळे संभाव्य विजेते म्हणून भारतालाच पसंती दिली जात आहे. मात्र इंग्लंड दौऱ्यात भारताविरुद्ध केलेल्या सुरेख कामगिरीचा फायदा आम्हाला होईल. महत्त्वाच्या स्पर्धाच्या अंतिम फेरीत आम्ही ढेपाळतो, याची पूर्ण जाणीव असून कामगिरी सुधारण्याचा आमचा प्रयत्न राहील. रविवारचा दिवस मोलाचा असून सर्वोत्तम योगदान देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. “
अ‍ॅलिस्टर कुक, इंग्लंडचा कर्णधार

मांडणी : दिनेश राणे