फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी १२२ धावांची गरज; पंत, पुजारा यांची झुंजार अर्धशतके; बेसची प्रभावी फिरकी

जो रूटच्या शतकमहोत्सवी द्विशतकाच्या बळावर इंग्लंडच्या फलंदाजांनी उभारलेला ५७८ धावांचा डोंगर सर करण्यासाठी चेपॉकवर पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची ६ बाद २५७ अशी केविलवाणी धडपड सुरू आहे. आघाडीची फळी कोसळल्यावर ऋषभ पंत (९१) आणि चेतेश्वर पुजाराने (७३) डावाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. आता फॉलोऑन टाळण्यासाठी १२२ धावांची गरज असलेल्या भारताची पुन्हा तळाच्या फलंदाजांवर भिस्त आहे.

इंग्लंडचे वर्चस्व रविवारी सलग तिसऱ्या दिवशी दिसून आले. पंतचे शतक थोडक्यात हुकले. त्याने ८८ चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांनिशी ९१ धावा केल्या, तर पुजाराने संयमी वृत्तीने १४३ चेंडूंत चार चौकारांसह ७३ धावांची खेळी साकारली. भारताची ४ बाद ७३ अशी अवस्था झाल्यानंतर पंत-पुजारा जोडीने पाचव्या गड्यासाठी २४ षटकांत ११९ धावांची भागीदारी केली. उत्तरार्धात वॉशिंग्टन सुंदर (६८ चेंडूंत ३३* धावा) आणि रविचंद्रन अश्विन (५४ चेंडूंत ८* धावा) यांनी ऑस्ट्रेलियातील यशाचा कित्ता गिरवून खेळपट्टीवर नांगर टाकला. सामन्याचे दोन दिवस शिल्लक असून, भारताची तळाची फळी अपयशी ठरल्यास फॉलोऑन लादून पुन्हा डाव गुंडाळण्याचे लक्ष्य इंग्लंडने आखले आहे.

भारताचा तारणहार पंतने पाच उत्तुंग षटकार खेचून रविवारी क्रिकेट चाहत्यांना खूश केले. डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीचच्या गोलंदाजीवर लाँग-ऑन आणि डीप मिड-विकेटच्या दिशेने मारलेले षटकार डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्याने ऑफ-स्पिनर डॉम बेसलाही एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार आणि स्क्वेअर लेगला चौकारही मारला, पण अखेरीस बेसनेच पंतला शतकापासून वंचित ठेवले.

भारताच्या रोहित शर्मा (६) आणि शुभमन गिल (२८) या सलामीवीरांनी निराशा केली. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने (२/५२) दोघांनाही तंबूची वाट दाखवली. कर्णधार विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. खेळपट्टीवर स्थिरावतो आहे, असे वाटत असतानाच बेसने त्याला बाद करून भारताला मोठा धक्का दिला. मग उपकर्णधार अजिंक्य रहाणेला बेसने १ धावेवरच मर्यादित ठेवले. पुजाराच्या खेळीलाही बेसनेच पूर्णविराम दिला. बेसने ५५ धावांत ४ बळी घेतले आहेत.

त्याआधी, सकाळच्या सत्रात ८ बाद ५५५ धावसंख्येवरून पहिल्या डावाला पुढे करणाऱ्या इंग्लंडला ५७८ धावसंख्येपर्यंतच धावसंख्या रेटता आली. जसप्रित बुमरा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

  • २० भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात एकूण २० नो-बॉल टाकले. यापूर्वी मायदेशातील कसोटीत फक्त एकदाच (वि. श्रीलंका, २००९) भारतीय गोलंदाजांनी नो-बॉलच्या रूपात इतक्या अवांतर धावा दिल्या आहेत.
  • १६ कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल १६ वर्षांनी प्रथमच एखाद्या संघाने भारताविरुद्ध १९०.१ षटके फलंदाजी केली. यापूर्वी २००५ मध्ये आफ्रिकेने १९०.४ षटके खेळून काढली होती.
  • २ मायदेशातील कसोटीमध्ये पहिल्या तीन डावांत किमान अर्धशतक झळकावणारा ऋषभ पंत हा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने अनुक्रमे ९२, ९२ आणि ९१ अशा धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मायदेशातील पहिल्या पाच कसोटी डावांत अर्धशतक साकारण्याचा विक्रम आहे.
  • ३ ऋषभ पंतने सलग तिसऱ्या कसोटीत (९७, नाबाद ८९ आणि ९१) अर्धशतक झळकावले. यांपैकी दोन वेळा तो नव्वदीच्या फे ऱ्यात बाद झाला.
  • ४पंत आणि पुजारा यांच्या जोडीने गेल्या चारही भागीदाऱ्यांसाठी किमान ५० धावांची भर घातली आहे. त्यांनी अनुक्रमे ५३, १४८, ६१ आणि ११९ अशा भागीदाऱ्या रचल्या आहेत.

पंतने आपल्या नैसर्गिक आक्रमक फलंदाजीच्या शैलीत बदल करावा असे मला अजिबात वाटत नाही, कारण अतिबचावात्मक पवित्रा स्वीकारल्यास तो लवकर बाद होईल. परंतु फटक्यांची निवड करताना संघाची गरज लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या चुकांमधून तो शिकेल, अशी अपेक्षा आहे. – चेतेश्वर पुजारा,  भारताचा फलंदाज

चेपॉकची तीन प्रेक्षागृहे अखेर खुली

चेन्नई : एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवरील आय, जे आणि के अशी तीन प्रेक्षागृहे २०१२ पासून बंद ठेवण्यात आली होती. मात्र १३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी प्रथमच ती खुली करण्यात येणार आहेत. २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर कायद्याचे उल्लंघन करून प्रेक्षागृहे बांधल्याप्रकरणी ती स्थानिक प्रशासनाने बंद ठेवली होती.

 

संक्षिप्त धावफलक

’ इंग्लंड (पहिला डाव) : १९०.१ षटकांत सर्व बाद ५७८ (जो रूट २१८, डॉमिनिक सिब्ली ८७, बेन स्टोक्स ८२; जसप्रित बुमरा ३/८४, रविचंद्र्रन अश्विन ३/१४६)

’ भारत (पहिला डाव) : ७४ षटकांत ६ बाद २५७ (ऋषभ पंत ९१, चेतेश्वर पुजारा ७३, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे ३३, शुभमन गिल २९; डॉम बेस ४/५५, जोफ्रा आर्चर २/५२)