भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका

ऑक्टोबरमध्ये मायदेशातच होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर योग्य संघबांधणी करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून भारत शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ करणार आहे.  यष्टीरक्षक, मधली फळी, वेगवान-फिरकी मारा कोण सांभाळणार, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे भारतीय संघासह चाहत्यांना या पाच सामन्यांच्या मालिकेद्वारे मिळतील.

मर्यादित षटकांच्या सामन्यांत इंग्लंडचा संघ अधिक धोकादायक मानला जातो. त्यातच जून महिन्यात होणाऱ्या आशिया चषकादरम्यान भारताचे महत्त्वाचे खेळाडू अनुपलब्ध असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंग्लंडसारख्या कडव्या प्रतिस्पर्धीविरुद्ध स्वत:च्या कमकुवत तसेच बलस्थानांची चाचपणी करण्याची संधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक बनवण्यात आली आहे.

 

रोहित-राहुल सलामीला; धवनला विश्रांती

पहिल्या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि के. एल. राहुल सलामीला उतरतील, असे कर्णधार कोहलीने स्पष्ट केले. अनुभवी शिखर धवनने स्थानिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली. परंतु राहुल ट्वेन्टी-२० प्रकारातील भारताचा सर्वोत्तम फलंदाज असल्याने त्यालाच रोहितच्या साथीने पसंती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादव पदार्पण करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या अशी फलंदाजांची फळी पाहायला मिळू शकते.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, थंगरासू नटराजन.

इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर.

१४ भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत १४ ट्वेन्टी-२० सामने झाले असून दोघांनीही प्रत्येकी सात सामने जिंकले आहेत.

७२ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांत ३,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी विराट कोहलीला (२९२८) आणखी ७२ धावांची आवश्यकता आहे.

१ यजुर्वेंद्र चहलला भारतासाठी ट्वेन्टी-२० सामन्यांत सर्वाधिक बळी मिळवणाºयांच्या यादीत अग्रस्थानी मजल मारण्यासाठी फक्त एका बळीची गरज आहे.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोटर््स १ हिंदी आणि एचडी वाहिन्यांवर