भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान येत्या १३ तारखेपासून होणार असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडूंचे आज नागपुरात आगमन झाले. सध्या देशात विविध ठिकाणी रणजी सामने खेळत असलेले चौघे वगळता सर्व भारतीय खेळाडू येथे येऊन पोहोचले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरुवारपासून व्हीसीएच्या जामठा मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशांचे संघ आज विशेष विमानाने दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी नागपूर विमानतळावर येऊन पोहोचले. तेथून ते वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे मुक्कामाच्या ठिकाणी रवाना झाले.
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, आर. अश्विन, इशांत शर्मा,  प्रग्यान ओझा, व मुरली विजय हे खेळाडू आले आहेत. युवराज सिंग, झहीर खान व हरभजन सिंग या तीन खेळाडूंना नागपूर कसोटीत डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी लेग स्पिनर पीयूष चावला, अष्टपैलू रवींद्र जडेजा व नवोदित वेगवान गोलंदाज परमिंदरसिंग अवाना या तिघांना संघात स्थान देण्यात आले आहे.
अजिंक्य रहाणे व अशोक दिंडा या दोघांचा आधीच भारतीय संघात समावेश असला तरी त्यांना रणजी सामन्यांसाठी मोकळे ठेवण्यात आले आहे. मुंबईचा अजिंक्य राहणे हा सध्या पंजाबविरुद्ध, तर पीयूष चावला हा नागपुरात उत्तरप्रदेशविरुद्ध रणजी सामना खेळत आहे. दिल्ली संघात असलेला अवाना याचा कर्नाटक संघाविरुद्ध बंगलोर येथे सामना सुरू आहे. अशोक दिंडा (बंगाल) आणि रवींद्र जडेजा (सौराष्ट्र) हे दोघे एकमेकांविरुद्ध राजकोट येथे रणजी सामना खेळत आहेत. त्यामुळे हे खेळाडू आज दुपारी संघासोबत नव्हते. उद्या रणजी सामन्यांचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे चावला वगळता इतर चौघे उद्या येथे पोहचण्याची अपेक्षा आहे.
इंग्लंड संघात कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकसह निक कॉम्प्टन, जो रूट, जोनाथन ट्रॉट, केव्हिन पीटरसन, इयान बेल, जेम्स अँडरसन, स्टीव्हन फिन, ग्रॅमी स्वान, इऑन मॉर्गन, मॅट प्रायर, माँटी पनेसार, समित पटेल, जॉनी बेअरस्टो, टिम ब्रेस्नन, स्टुअर्ट ब्रॉड, ग्रॅहम ओनियन्स, स्टुअर्ट मीकर व जेम्स ट्रेडवेल यांचा समावेश आहे.    

पारंपरिक पद्धतीने स्वागत
दुपारी २ वाजता हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे पोहचलेल्या दोन्ही संघांच्या खेळाडूंचे महिलांनी औक्षण करून, टिळा लावून व हार घालून पारंपरिक रितीने स्वागत केले. एका कार्यक्रमासाठी आलेले लोक हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये उभे होते. त्यापैकी एका लहान मुलाने इंग्लंडचा युवा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक याची स्वाक्षरी मागितली, तेव्हा कुक याने आपल्या गळ्यातील हार त्या मुलाच्या गळ्यात घातल्यामुळे हा मुलगा अतिशय आनंदून गेला.

आजपासून सराव
इंग्लंडचा संघ मंगळवारी सकाळी ९.३० वाजता, तर भारतीय संघ दुपारी १.३० वाजता व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर सराव करणार आहे. इंग्लंडचे काही खेळाडू सकाळी ७.३० वाजता सामनास्थळी सराव करणार असल्याचीही माहिती आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर रविवारी संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान भारताचा सात गडय़ांनी पराभव करून इंग्लंड संघाने मालिकेत २-१ अशी अनपेक्षित आघाडी घेतली आहे. मालिका जिंकण्याची संधी भारताने गमावली असली, तरी नागपूरचा सामना जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्याची ‘धोनी ब्रिगेड’ला संधी असल्यामुळे भारतीय संघासाठी नागपूरची कसोटी महत्त्वाची आहे.