दुखापतींमधून सावरल्यानंतर तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय हॉकी संघाचा अनुभवी गोलकिपर पी. आर. श्रीजेशचं भारतीय संघात आगमन झालेलं आहे. गेल्या काही वर्षांत श्रीजेशने आपल्या अभेद्य बचावाच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. मात्र दुखापतीच्या काळात मैदानाबाहेर गेल्यानंतर आकाश चिकटे आणि सुरज करकेराने त्याची उणीव भारतीय संघाला जाणवू दिली नाही. आता २०१८ साली भारतीय हॉकी संघाचं व्यस्त वेळापत्रक पाहता, न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या चौरंगी मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा – न्यूझीलंडमधील चौरंगी मालिकेसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, पी. आर. श्रीजेशचं पुनरागमन

“भारतीय संघात माझी निवड झाली याचा आनंद आहेच. दुखापतीमुळे गेले ६ महिने मैदानाबाहेर राहणं हा काळ माझ्यासाठी प्रचंड कठीण होता. मात्र आता आगामी वर्षांत आम्ही आमचा खेळ सुधारण्यावर भर देणार आहोत. गोल करण्यासाठी नवीन तंत्र आत्मसात करण्याचा आमचा कल असेल. तसेच या स्पर्धेतून मला माझा हरवलेला आत्मविश्वास मिळेल.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत श्रीजेश बोलत होता.

भारतीय संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी श्रीजेशचं संघात पुनरागमन हा चांगला संकेत असल्याचं म्हटलं आहे. “श्रीजेश हा अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाचा आणि तो मैदानात असण्याचा भारतीय संघाला फायदाच होईल. मात्र त्याच्या अनुपस्थितीत आकाश आणि सुरज यांनी चांगली कामगिरी केली. त्यातच आता क्रिशन पाठकला मिळालेली संधी, यामुळे भारतीय संघात अधिकाधिक तरुण खेळाडू तयार होत असल्याचं दिसतं आहे.” याचसोबत कर्णधार मनप्रीत सिंहनेही श्रीजेशच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.