आशियाई क्रीडा स्पर्धा

जकार्ता : शनिवारच्या शुभारंभ सोहळ्याने सुरू होणाऱ्या १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी विविध क्रीडाप्रकारांमधील भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. या स्पर्धेत भारताला आठ विशिष्ट खेळांमध्ये सर्वाधिक आशा असून त्यात कुस्ती, बॅडमिंटन, नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स, टेनिस, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स आणि टेबल टेनिस या खेळांचा समावेश असल्याचे मानले जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा ही ऑलिम्पिकच्या खालोखाल सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे त्यात आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आशियातील प्रत्येक देशाचा खेळाडू सर्वस्व पणाला लावतो. यंदा भारताला ज्या प्रमुख आठ क्रीडा प्रकारांमध्ये पदके मिळण्याची प्रमुख आशा आहे. त्या खेळांमध्ये एकापेक्षा अधिक खेळाडू पदके मिळवून देतील, अशी चिन्हे आहेत.

कुस्तीत सर्वाधिक पदके

भारताला कुस्तीमध्ये ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनिया, ७४ किलो वजनी गटात सुशील कुमार तर महिलांमध्ये साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्याकडून पदक मिळण्याची अपेक्षा आहे.

 बॅडमिंटनमध्ये पदक निश्चित

बॅडमिंटनमध्ये महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात भारताला पदकांची अपेक्षा आहे. महिला गटात पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल तर पुरुष गटात किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीतसह अन्य खेळाडूंकडूनही पदकप्राप्तीची अपेक्षा आहे. भारताला चीन, जपान आणि यजमान इंडोनेशियाच्या खेळाडूंकडून कडवी लढत मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, किमान एक पदक तरी निश्चित मानले जात आहे.

नेमबाजीत ‘लक्ष्य’ साधणार?

नेमबाजीमध्ये भारताला १६ वर्षांची मनू भाकेरकडून प्रामुख्याने पदकाची अपेक्षा आहे. राही सरनोबतसह अन्य नेमबाजदेखील चांगल्या लयीत असल्याने पदक मिळवू शकतात. अर्थात मनूसारख्या युवा खेळाडूंवर अपेक्षांचा दबाव टाकू नये, असा सूरदेखील व्यक्त होत आहे.

अ‍ॅथलेटिक्समध्ये विजयी झेंडा

भारतीय संघाचा ध्वजधारक बनण्याचा मान यंदा भालाफेकपटू नीरज चोप्राला देण्यात आला आहे. त्यामुळे भालाफेकीत भारताला किमान एक पदक, तर आसामची युवा धावपटू हिमा दासकडून ४०० मीटरमध्ये पदकाच्या कामगिरीची भारताला अपेक्षा आहे. तिने राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये दिलेली वेळ ही गतवेळच्या इन्चॉन आशियाई स्पध्रेतील सुवर्णविजेत्या केमी अडेकोयापेक्षा (५१.५९ सेकंद) चांगली असल्याने या दोघांकडूनही सुवर्ण पदकाचीच अपेक्षा बाळगली जात आहे. त्याशिवाय सीमा पुनियाकडून थाळीफेकमध्ये तर द्युतीकडून १०० मीटरच्या स्पर्धेत पदक अपेक्षित आहे.

टेनिस व टेबल टेनिसमध्ये चांगली कामगिरी

टेनिसमध्ये भारताकडून रोहन बोपन्ना आणि दिविज शरण यांच्याकडून दुहेरीत, तर रामकुमार रामनाथनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, तर टेबल टेनिसमध्ये मनिका बात्राकडून पदकप्राप्ती होण्याची शक्यता आहे.

दीपा कर्माकरचे पुनरागमन

ऑलिम्पिकमध्ये चमक दाखवल्यानंतर दुखापतीमुळे राष्ट्रकूल स्पर्धा हुकलेली भारतीय जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर आशियाई स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत पदक मिळवून पुन्हा एकदा लय प्राप्त करण्याचा दीपाचा निर्धार आहे.

बॉक्सिंगमध्ये विजयी पंच

बॉक्सिंगमध्ये भारताकडून दोन वेळचा आशियाई पदकविजेता विकास कृष्णन, शिवा थापा यांच्याकडून पुरुष गटात पदक मिळवून देणारी कामगिरी अपेक्षित आहे. तर महिला गटात विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सोनिया लाथेरकडून पदक मिळण्याची अपेक्षा आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सहभागाच्या तयारीसाठी या स्पर्धेतून मेरी कोमने माघार घेतली असल्याने महिला गटात सोनियावरील जबाबदारी वाढली आहे.