२०१८ फिफा विश्वचषक स्पध्रेच्या पात्रता फेरीत भारतासमोर बुधवारी बलाढय़ इराणचे आव्हान आहे. बंगळुरू येथील श्री कांतीरावा स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत विजय साजरा करून भारत ५६ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असेल. १९५९मध्ये भारताने इराणवर दुसरा आणि अखेरचा विजय साजरा केला होता.
पात्रता फेरीत ओमान आणि ग्वामा संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताला या लढतीत विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे. मात्र जागतिक क्रमवारीत ४०व्या क्रमांकावर असलेल्या इराणला नमवणे १५५व्या क्रमांकावरील भारताला तितकेसे सोपे नाही. तरीही या लढतीत सर्वोत्तम खेळ करण्याचा निर्धार भारताचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘‘क्रमवारीत ते आमच्यापेक्षा खूप आघाडीवर आहेत आणि त्यांच्याकडे सर्वोत्तम प्रशिक्षकही आहे. भूतकाळातील अथक प्ररिश्रमामुळे ते आज आघाडीवर आहेत. त्यांच्या प्रति आम्हाला आदर आहे, परंतु त्याला भीतीचे नाव देऊ नका. हा अकरा विरुद्ध अकरा असा सामना आहे आणि आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.’’
सामना : भारत विरुद्ध इराण
वेळ : सायंकाळी ७ वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी किक्स, सोनी सिक्स एचडी