बाद फेरीसाठी विजय मिळविणे अनिवार्य असलेल्या भारताला सुदीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी तीन वेळा विजेत्या दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
भारताला या स्पर्धेतील पहिल्या लढतीत मलेशियाने ३-२ असे हरविले होते. या पराभवामुळे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्याच्या भारताच्या आशा धूसर झाल्या आहेत. त्यांना कोरियाविरुद्ध विजय मिळविणे अनिवार्य आहे, मात्र कोरियाने आतापर्यंत तीन वेळा ही स्पर्धा जिंकली असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. कोरियन संघात वान होसान व सुंगजी हियुन या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. किदम्बी श्रीकांत व सायना नेहवाल यांनी विजय मिळविले तर भारताला ही लढत जिंकणे सोपे होईल. महिलांच्या दुहेरीत राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांची ली सोहेई व शिन सुंग चान यांच्याविरुद्ध कसोटी ठरणार आहे. फेब्रुवारीत ज्वाला व पोनप्पा यांना कोरियाच्या या जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता.
श्रीकांतला एकेरीत वान होसान याच्याशी खेळावे लागणार आहे. श्रीकांतने त्याच्याविरुद्ध दोन वेळा विजय मिळविला असला, तरी गेल्या तीन लढतीत श्रीकांतला पराभव स्वीकारावा लागला आहे. महिला एकेरीत सायनाला हियुन हिच्याविरुद्ध विजय मिळविताना फारशी अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे.