नवी दिल्ली : विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये दडपण हाताळण्यात जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत भारताचा क्रिकेट संघ विश्वविजेता ठरणे कठीण आहे, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.

‘‘जेव्हा निर्णायक लढतींमध्ये चांगली कामगिरी एखाद्याकडून होते तेव्हा तो खेळाडू सर्वोत्तम ठरतो. मात्र सध्या आपण निर्णायक लढतींमध्ये दडपण हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचे लक्षात येत आहे. विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये साखळी लढतींमध्ये चांगली कामगिरी होते मात्र बाद फेरीसारख्या उपांत्य लढतींमध्ये अपयशी कामगिरी होते. मानसिक दडपण हाताळण्यात आपण कमी पडत आहोत,’’ असे सांगताना गंभीरने २०१९मधील विश्वचषकातील भारताच्या कामगिरीकडे लक्ष वेधले.

भारताने मर्यादित षटकांचा एकदिवसीय विश्वचषक १९८३ आणि २०११ असा दोन वेळा जिंकला आहे. मात्र चार वेळा उपांत्य लढतींत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामध्ये २०१५ आणि २०१९ या दोन मागील विश्वचषकांचा समावेश आहे. ट्वेन्टी-२०मध्ये भारताने २००७मध्ये विश्वचषक जिंकला आहे. ‘‘भारतासारख्या संघाने भरपूर यश मिळवल्याचे आपण म्हणत असतो. विश्वविजेता होण्याची क्षमता भारताने सिद्ध केलेली आहेच. मात्र जोपर्यंत क्रिकेटच्या मैदानात हे सिद्ध करत नाही तोपर्यंत विश्वविजेता संघ अशी ओळख निर्माण होणार नाही,’’ असे गंभीरने सध्याच्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाबाबत म्हटले.