लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती सायना नेहवाल ही पहिल्या तिमाही सत्रात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला बॅडमिंटनपटूंमध्ये द्वितीय स्थानावर आहे. पहिल्या स्थानी चीनची चेन युफेई प्रथम स्थानी, तर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली ताय त्झु यिंग तृतीय स्थानावर आहे.

ऑल इंग्लंड चॅम्पियन्स स्पर्धेची विजेती युफेइने ८६३२५ डॉलर्सच्या बक्षिसासह कमाईत अव्वल स्थान मिळवले आहे. तर सायनाने इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद आणि मलेशिया मास्टर्सच्या उपांत्य फेरीपर्यंतच्या कामगिरीतून ३६८२५ डॉलर्सची कमाई केली आहे.

पुरुषांमध्ये जपानच्या केंटो मोमोटाने जर्मन खुली बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद आणि ऑल इंग्लंडचे विजेतेपद तसेच इंडोनेशिया मास्टर्सचे उपविजेतेपद पटकावताना एकूण ९४५५० डॉलर्सची कमाई करीत बॅडमिंटनपटूंमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तर डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सलसेनने ४४१५० डॉलर्सच्या कमाईसह द्वितीय, तर शी युकीने २८५७५ डॉलर्स कमाईसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.