विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेशवर कसोटी मालिकेत २-० ने मात केली. दोन्ही कसोटी सामन्यात भारताने डावाने विजय मिळवला. मात्र इंदूर येथील पहिल्या कसोटी सामन्यात एक वेगळंच चित्र पहायला मिळालं. भारतीय कसोटी संघात स्लिपमध्ये झेल घेण्याचा चांगला विक्रम असलेल्या अजिंक्य रहाणेने काही झेल टाकले. कोलकाता कसोटी सामन्यातही आश्विनच्या गोलंदाजीवर रहाणेने काही झेल टाकले. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

“ज्यावेळी अजिंक्य झेल टाकतो, त्यावेळी मलाही आश्चर्य वाटतं. तो स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव करतो ते पाहिलं की तो सर्वोत्तम खेळाडू का आहे हे कळतं. इंदूरमध्ये खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत होता. आश्विन हा उंचपुरा गोलंदाज आहे, माझ्यामते रहाणे स्लिपमध्ये थोडासा पुढे उभा राहिल्यामुळे चेंडू त्याच्या छातीपर्यंत येत होता. त्यामुळे बॅटची कड घेऊन चेंडू आल्यानंतर त्यावर रिअ‍ॅक्ट होण्यासाठी त्याला कमी वेळ मिळाला असेल. यात त्याचं कौशल्य कमी पडलंय अशातला काही भाग नाही.” श्रीधर New Indian Express वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

बांगलादेशवर मिळवलेल्या मालिका विजयात अजिंक्यनेही मोलाची भूमिका बजावली. बांगलादेशविरुद्धची मालिका ही २०१९ सालातही भारताची अखेरची कसोटी मालिका होती. २०२० सालात भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल, या मालिकेत अजिंक्य रहाणे भारतीय संघात पुनरागमन करेल.