लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध १५१ धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताचा हा विजय असा होता, ज्यात संघाच्या प्रत्येक सदस्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये सर्वात संस्मरणीय पाचव्या दिवसाचे पहिले सत्र होते, जेव्हा मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यात जबरदस्त भागीदारी झाली होती. शमीने अर्धशतक ठोकले आणि दोन्ही खेळाडू जेवणासाठी ड्रेसिंग रूममध्ये परतताच, संपूर्ण टीम त्यांचे स्वागत करण्यासाठी खाली आली, ज्याने सर्वांना प्रभावित केले. शमी आणि बुमराहच्या स्वागताचा निर्णय कर्णधार विराट कोहलीने घेतला होता.

भारताच्या विजयानंतर संघाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर याचा खुलासा केला आहे. अश्विन सोबत, संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर देखील व्हिडिओमध्ये उपस्थित होते आणि दोघांनी संपूर्ण सामन्यात भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल आणि शमी-बुमराहची भागीदारी आणि ड्रेसिंग रूममध्ये त्यांचे स्वागत यासह विविध महत्त्वाच्या क्षणांवर चर्चा केली.

क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर म्हणाले, “जेव्हा आम्हाला समजले की हे दोघे जेवणासाठी ड्रेसिंग येतील, तेवढ्यात विराट आला आणि म्हणाला, आम्ही सर्व खाली जाऊ आणि त्यांच्यासाठी जल्लोष करु आणि जोरात टाळ्या वाजवू. आपला आवाज इतका मोठा असला पाहिजे की लॉर्ड्सवर येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत तो घुमत राहिला पाहीजे. मग मी मीडिया मॅनेजरला फोन केला आणि त्या क्षणाता व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितले.

हेही वाचा- एकाच चेंडूंवर तीनवेळा अपील, आणि विकेट मिळाली!

सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघ पहिल्या सत्रात अडचणीत दिसत होता. संघाने २०६ धावांवर ८ गडी गमावले होते. यानंतर बुमराह आणि शमीने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि दीर्घ भागीदारी रचली, ज्यामुळे भारतीय संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. शमीने या काळात कसोटी क्रिकेटमधील आपले दुसरे अर्धशतकही केले. दोघांमध्ये ८९ धावांची भागीदारी झाली आणि भारताने २९८ धावांवर आपला डाव घोषित केला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी २७२ धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात इंग्लंडचा फक्त ५२ षटकांत १२० धावांनी पराभव करून १५१ धावांनी अविस्मरणीय विजयाची नोंद केली.