भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन-डे सामन्यात अखेरीस यजमान संघाने बाजी मारली. भारतीय संघाने विजयासाठी दिलेलं ३४८ धावांचं आव्हान न्यूझीलंडने अनुभवी रॉस टेलरच्या शतकाच्या जोरावर पूर्ण केलं. मात्र या सामन्यातही षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी भारतीय संघाला आयसीसीच्या शिक्षेला सामोरं जावं लागलेलं आहे. निर्धारित वेळेच्यानंतर भारतीय संघाने सामन्यातली ४ षटकं टाकल्यामुळे भारतीय संघावर ही कारवाई करण्यात आली आहे. संघाच्या मानधनातली ८० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे. सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी यासंदर्भात घोषणा केली.

याआधीही भारतीय संघाला टी-२० मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांमध्ये आयसीसीच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं होतं. यासाठी भारतीय संघाच्या मानधनातली अनुक्रमे २० आणि ४० टक्के रक्कम कापून घेण्यात आलेली होती. दरम्यान पहिल्या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ पुनरागमन करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.