भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका

१९९२च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वापरलेल्या गडद निळ्या रंगाच्या पोशाखात भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी सिडनीत होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला प्रारंभ करणार आहे. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील उपकर्णधार रोहित शर्माची अनुपस्थिती भारताला तीव्रतेने भासणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावरून मार्चच्या पूर्वार्धात परतल्यापासून करोनाच्या साथीमुळे विश्रांती घेत होता, पण आता आंतरराष्ट्रीय हंगामाला सुरुवात होत असताना बऱ्याचशा समस्यांत समोर उभ्या ठाकल्या आहेत. रोहितच्या मांडीला झालेली दुखापत ही राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली आहे, पण आता त्याच्या अनुपस्थितीमुळे भारताला आघाडीच्या फळीची पुनर्रचना करावी लागणार आहे. गेले दोन महिने संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) भारताच्या बऱ्याचशा खेळाडूंना सरावाची संधी मिळाली आहे.

१९९२च्या विश्वचषकातील नऊ संघांपैकी भारताची कामगिरी सातव्या क्रमांकाची म्हणजेच असमाधानकारक झाली होती. त्यामुळे या अपयशी विश्वचषकातील पोशाख सध्या चर्चेत आहे.

बुमरा-शमीला आळीपाळीने विश्रांती

भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा जसप्रित बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्यावर प्रामुख्याने आहे. परंतु आगामी कसोटी मालिकेच्या दृष्टिकोनातून या दोघांना आळीपाळीने विश्रांती देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांना मात्र पुरेशी संधी मिळू शकेल. दोन फिरकी गोलंदाजांसह भारतीय संघ रणनीती आखेल. मधल्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर मनगटी फिरकी गोलंदाज यजरुवेद्र चहल अंकुश ठेवू शकेल.

सलामीला शुभमन की मयांक?

‘आयपीएल’मध्ये सातत्याने धावा करणाऱ्या शिखर धवनच्या साथीला युवा शुभमन गिल किंवा त्याच्यापेक्षा अनुभवी मयांक अगरवाल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल. विराटसुद्धा अ‍ॅडम झम्पासह ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रेयस अय्यर चौथ्या स्थानावर आणि उपकर्णधार के. एल. राहुल पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरेल. धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंडय़ा सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर उतरेल.

रोहितच्या जागी मयांक योग्य – फिंच

भारताच्या एकदिवसीय संघात मुबलक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळत नसेल, तर त्याच्या जागेसाठी मयांक अगरवाल योग्य सलामीवीर आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने व्यक्त केले आहे.

आव्हानात्मक त्रिकूट

सूर गवसलेला स्टीव्ह स्मिथ, सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि संघाचा तारणहार मार्नस लबूशेन या त्रिकुटाचा ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर सामना करणे हे भारतीय गोलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरू शकेल. मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल आणि अ‍ॅलेक्स केरी यांच्यासारखे हरहुन्नरी फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीत समाविष्ट आहेत. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्यासारखे जागतिक क्रिकेटमधील दर्जेदार वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात आहे. याशिवाय जोश हॅझलवूड, सीन अ‍ॅबॉट यांचाही वेगवान माऱ्यात समावेश आहे.

तिकिटे संपली

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळाकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी ५० टक्के आसनांकरिता प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. ही सर्व तिकिटे संपल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जोन्ससाठी काळी फीत

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे ‘आयपीएल’दरम्यान निधन झाले होते. शुक्रवारी सामन्याआधी एक मिनिटे मौन पाळण्यात येणार आहे, तसेच दोन्ही संघांचे खेळाडू जोन्स यांच्या स्मरणार्थ काळ्या फिती लावणार आहेत.

८८

सिडनी मैदानावर आतापर्यंत १५० एकदिवसीय सामने झाले असून, यापैकी ८८ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने, तर ६२ सामने धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. मागील पाचही सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

८७

सडनीत ऑस्ट्रेलियाने १३२ सामन्यांपैकी ८७ सामने जिंकले आहेत, तर ३९ सामने गमावले आहेत.

सिडनीत भारताने २० सामन्यांपैकी फक्त पाच सामने जिंकले आहेत, तर १४ सामन्यांत पराभव पत्करला आहे. यापैकी ऑस्ट्रेलियाशी झालेल्या १७ सामन्यांपैकी १४ सामने गमावले आहेत, तर दोन विजय मिळवले आहेत.

७८-५२

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आतापर्यंत एकूण १४० एकदिवसीय सामने झाले असून, यापैकी ७८ सामने ऑस्ट्रेलियाने आणि ५२ सामने भारताने जिंकले आहेत.

१३

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ५१ सामने खेळला असून, यापैकी ३६ सामने ऑस्ट्रेलियाने आणि १३ सामने भारताने जिंकले आहेत.

१७

फंचच्या खात्यावर ४९८३ धावा जमा असून, आणखी १७ धावांची भर घातल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो पाच हजार धावांचा टप्पा गाठू शकेल.

४३

पंडय़ाच्या खात्यावर ९५७ धावा जमा असून, आणखी ४३ धावा केल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो एक हजार धावा पूर्ण करू शकेल.

मोहम्मद शमीने ९९ एकदिवसीय बळी मिळवले असून, आणखी एक बळी मिळवल्यास तो शतक साकारू शकेल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, के. एल. राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, मयांक अगरवाल, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झम्पा, जोश हॅझलवूड, सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टॉन अगर, कॅमेरून ग्रीन, मोझेस हेन्रिक्स, अ‍ॅण्ड्रय़ू टाय, डॅनिएल सॅम्स, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक).

* सामन्याची वेळ : सकाळी ९.१० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन १, ३ आणि एचडी वाहिन्या.