आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन हा बीसीसीआयसाठी महत्वाचा मुद्दा बनला आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केली होती. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. यासाठी सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत बीसीसीआय या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या विचारात आहे. श्रीलंका, UAE आणि न्यूझीलंड या तीन देशांनी आतापर्यंत बीसीसीआयला तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र आयपीएल आयोजनासाठी भारत बीसीसीआयची पहिली पसंती असल्याचं, अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं.

“हे वर्ष आयपीएलशिवाय संपू नये अशी आमची इच्छा आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत हीच आमची पहिली पसंती असणार आहे. ३५-४० दिवसांमध्ये आयोजन करता येणं शक्य असणार असेल तरीही स्पर्धेचं आयोजन होईल. भारताबाहेर स्पर्धेचं आयोजन हा देखील एक पर्याय आहे, मात्र यामुळे खर्च वाढणार आहे. सर्वात प्रथम ठरवलेल्या वेळेत स्पर्धेचं आयोजन करता येईल की नाही हे आम्ही पाहणार आहोत, आणि भारतात आयोजन शक्य नसेल तरच मग परदेशी आयोजनाचा विचार होईल. यासाठी सर्व आर्थिक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.” गांगुली India Today च्या Inspiration या कार्यक्रमात बोलत होता.

भारतात अजुनही करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्याप निवळलेली नाही. मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई यासारख्या सर्व महत्वाच्या शहरांमध्ये करोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसी काय निर्णय घेतं आणि आयपीएलच्या आयोजनाबद्दल बीसीसीआय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.