भारताने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० कलम काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. इतर देशांनीही या प्रकरणी भारताला पाठिंबा दर्शवला. पण पाकिस्तानला मात्र हा निर्णय रूचला नाही. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने यावर टीका केली आणि भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरवरही वैयक्तिक टीका केली. यावर बोलताना शाहिद आफ्रिदी बिनडोक आहे, अशी टीका गंभीरने केली आहे.

काश्मीर मुद्द्यावर आफ्रिदी बरळला; गंभीरने लगावली सणसणीत चपराक

“काश्मीरी जनतेच्या समर्थनार्थ पंतप्रधान इम्रान खान यांनी एक कार्यक्रम सुरू केला आहे. यास तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्या. शुक्रवारी दुपारी १२ वाजता मी मजार-ए-कैद येथे उपस्थित राहणार आहे. आपल्या काश्मीरी बांधवांच्या समर्थनासाठी तुम्हीदेखील माझ्यासोबत या. ६ सप्टेंबर रोजी मी शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे आणि लवकरच LOC वरही भेट देणार आहे”, असे आफ्रिदीने ट्विट केले होते.

त्याच्या या ट्विटवर गौतम गंभीरने त्याला सणसणीत शाब्दिक चपराक लगावला. ”या फोटोमध्ये शाहिद आफ्रिदी स्वतः आफ्रिदीलाच विचारत आहे की आफ्रिदीने स्वत: आणखी ओशाळवाणे आणि निर्लज्ज होण्यासाठी पुढे काय करावे? ज्यामुळे हे सिद्ध होईल की आफ्रिदी अजूनही अपरिपक्वच आहे. मी आफ्रिदीसाठी शिशु वर्गातील विद्यार्थ्यांसाठीचे ट्युटोरियल ऑर्डर केले आहे”, अशा शब्दात गंभीरने त्याला उत्तर दिले.

याशिवाय एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेतही त्याने आफ्रिदीवर टीका केली. “काही लोक आयुष्यभर मोठेच होत नाहीत. पूर्ण आयुष्य क्रिकेट खेळूनही ते लोक अद्याप लहानच राहतात. प्रत्येक मुद्द्याचा जर राजकीय वापर करायचा असेल तर आफ्रिदीने राजकारणात यायला हवे. राजकारणात हुशार आणि डोकेबाज लोकांची गरज आहे. पण आफ्रीदीला डोकंदेखील नाही. तो बिनडोक आहे”, अशा शब्दात गंभीरने आफ्रिदीवर टीका केली.

दरम्यान, आफ्रिदीला ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिल्यानंतर आफ्रिदीने गंभीरवर वैयक्तिक टीका केली होती.