भारताच्या सायकलपटूंनी ट्रॅक आशिया चषक स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी आपला दबदबा सिद्ध करताना सहा पदकांची कमाई केली. यामध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. इंदिरा गांधी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पध्रेत देबोराह हेरोल्डने दोन सुवर्णपदक पटकावली. तिने महिलांच्या एलिट गटात ५०० मीटर शर्यतीत ३५.९६४ सेकंदाची वेळ नोंदवून पहिले सुवर्ण जिंकले. मलेशियाच्या मोहम्मद अदनान फरिना शावती आणि हाँगकाँगच्या यीन यीन यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सांघिक महिला गटात भारतीय संघाने ३५.९६२ सेकंदासह सुवर्णपदक निश्चित केले. या संघात देबोराह आणि केझिया वर्घीसी यांचा समावेश होता. कझाकस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर राजकुमारी देवीला कांस्यपदक देण्यात आले. ‘गेल्या दहा दिवसांपासून पाठीच्या दुखण्याने डोके वर काढले होते, परंतु माझ्यासाठी यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. यापुढेही पदकसंख्या वाढवण्यात यशस्वी होईन, अशी आशा आहे. प्रत्येक स्पध्रेत वेळेत सुधारणा करण्याचे लक्ष्य आहे,’ असे देबोराहने सांगितले.

पुरुषांच्या सांघिक गटात इराणने ४६.३३० सेकंदासह सुवर्णपदक पटकावले. मलेशिया (४७.९९९ सेकंद) आणि कझाकस्तान (४७.६४१ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले. भारताच्या कनिष्ठ पुरुष संघाने रौप्यपदकाची कमाई केली. त्यांनी ४९.२९९ सेकंदासह कझाकस्तानवर कुरघोडी केली. कनिष्ठ महिलांनी मात्र सुवर्णपदक पटकावले. तसेच अलेना रेजीने कनिष्ठ महिला गटात रौप्यपदक पटकावले.