भारताने दोन सुवर्णपदके मिळवीत राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत पाचवे स्थान मिळवले आणि समाधानकारक सांगता केली. ही दोन्ही सुवर्णपदके त्यांना टेनिसमध्ये मिळाली.
भारताच्या शशीकुमार मुकुंदने मुलांमध्ये तर ध्रुती वेणुगोपाळने मुलींच्या गटात एकेरीचे विजेतेपद पटकावले. भारताने टेनिसमध्ये पाच गटांपैकी तीन गटांमध्ये सुवर्णपदक पटकावले.
अंतिम फेरीत ध्रुतीने नामिबियाच्या लेसेदी जेकबचा ६-३, ६-० असा धुव्वा उडवला. तिने जमिनीलगत परतीचे सुरेख फटके मारले. सामना संपल्यानंतर ती म्हणाली, ‘‘विजेतेपद मिळविण्यासाठीच मी हा सामना खेळले. पहिला सेट घेतल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला, त्यामुळे दुसरा सेट मी सहज जिंकू शकले. हा माझ्या कारकीर्दीतील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.’’
मुलांमध्ये मुकुंदनेही एकतर्फी विजय मिळवला. त्याने स्कॉटलंडच्या एवेन लुम्सदेनवर ६-१, ६-२ अशी सहज मात करताना पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला. ‘‘लुम्सदेनच्या खेळाचा मी अभ्यास केला होता. त्यामुळे त्याच्यावर मात करताना मला फारशी अडचण आली नाही. मी माझ्या क्षमतेइतका शंभर टक्के खेळ केला, त्यामुळेच सुरुवातीला मी खेळावर नियंत्रण मिळवले व ते शेवटपर्यंत टिकवले,’’ असे मुकुंदने सांगितले.
ध्रुतीने मुकुंदच्या साथीने मिश्र दुहेरीत अव्वल यश मिळवले, त्याबाबत ती म्हणाली, ‘‘खरे तर मी मुकुंदबरोबर प्रथमच मिश्र दुहेरीत खेळत होते, तरीही आमच्यात चांगला समन्वय होता. माझ्यासाठी हा नवीन अनुभव होता तरीही मी खेळाचा निखळ आनंद घेऊ शकले.’’
भारताचे पथक प्रमुख व झारखंड अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष मधुकांत पाठक यांच्या हस्ते मुकुंद व ध्रुती यांना मिश्र दुहेरीची सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत भारताचे २५ खेळाडू सहभागी झाले होते.

गुणतालिका

क्र. देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१. ऑस्ट्रेलिया २४ १९ १९ ६२
२. द. आफ्रिका १३ ७ १५ ३५
३. इंग्लंड १२ १६ १६ ४४
४. मलेशिया ११ ३ ३ १७
५. भारत ९ ४ ६ १९