भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची अमेरिका हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

२०१२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या हरेंद्र सिंग यांनी २०१७ ते २०१८ या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याआधी त्यांनी महिला संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी निभावली होती.

५५ वर्षीय हरेंद्र लवकरच आपल्या कुटुंबासह अमेरिकेत दाखल होणार आहेत. २०१८च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्याचबरोबर भुवनेश्वर येथे झालेल्या २०१८च्या विश्वचषक स्पर्धेत हरेंद्र यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच २०१८ चॅम्पियन्स करंडक आणि २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कांस्यपदकाची कमाई केली होती.

हरेंद्र यांनी महिला संघाला २०१७च्या आशिया चषकात सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याचबरोबर भारताच्या कनिष्ठ संघालाही २०१६च्या कनिष्ठ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकून देण्यात योगदान दिले होते. कनिष्ठ आणि वरिष्ठ संघांचे प्रशिक्षकपद सांभाळताना हरेंद्र यांनी देशाला आठ सुवर्णपदके, पाच रौप्य आणि नऊ कांस्यपदके जिंकून दिली आहेत. ३०० सामन्यांत त्यांनी भारताच्या विविध संघांच्या प्रशिक्षकपदाची भूमिका निभावली आहे.

अमेरिकेच्या पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची संधी दिल्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. माझ्या अनुभवासह नव्या प्रवासासाठी मी सज्ज झालो असून खेळाडूंना त्यांच्या कमकुवत दुव्यांवर मेहनत घेऊन क्षमता सुधारण्यावर माझा भर राहील.

– हरेंद्र सिंग