दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आश्वासक कामगिरी केल्यानंतर, भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. आफ्रिका दौऱ्यातील शेवटची कसोटी आणि वन-डे व टी-२० मालिकेतली भारताची कामगिरी पाहता, भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात हरवू शकतो असं मतही गांगुलीने व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – ‘कोहलीची आक्रमक शैली ही नैसर्गिकच’

भारतीय संघाचा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला इतिहास फारसा आश्वासक नाही. याआधी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत १-३ तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०-२ अशा फरकाने भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रातील आपल्या स्तंभात लिहीताना सौरव गांगुलीने विराटच्या भारतीय संघाला शाबासकी दिली आहे. “विराट कोहलीने आफ्रिका दौऱ्यात आपल्या फलंदाजीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्याच्या या कामगिरीचा भारतीय संघाला आगामी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नक्की फायदा होईल. कारण या संघात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची क्षमता आहे. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रित बुमराह यांनीही आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावीत केलं आहे.”

आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. पहिले दोन कसोटी सामने गमावल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारताने दमदार पुनरागमन करत आफ्रिकेला निर्भेळ यश मिळू दिलं नाही. भारताच्या या कामगिरीचा त्यांना वन-डे आणि टी-२० मालिकेसाठी फायदा झाल्याचं मतही सौरव गांगुलीने यावेळी व्यक्त केलं.

अवश्य वाचा – भारतीय संघाचा दिलदारपणा, केप टाऊनची पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी आर्थिक मदत