ऋषिकेश बामणे

झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचा दावा

वेगवान गोलंदाजांची सक्षम फळी, फिरकीचे त्रिकूट, उपयुक्त अष्टपैलू जोडी आणि अनुभवी फलंदाजांचा योग्य समतोल साधल्यामुळे आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला विश्वविजेतेपद मिळवण्याची सर्वोत्तम संधी आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी क्रिकेटपटू आणि झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी व्यक्त केली.

* विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाविषयी तुमचे काय मत आहे?

खरे सांगायचे तर, विश्वचषकासाठी निवडण्यात आलेले आपले पंधराही खेळाडू सर्वोत्तम आहेत. मुख्य म्हणजे जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची फळी आपल्याकडे उपलब्ध आहे. जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांच्याकडे १४० किमी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहेच. याशिवाय त्यांना उत्तम साथ देणारे कुलदीप यादव, रवींद्र जडेजा व यजुर्वेद्र चहल यांचे फिरकी त्रिकूटही संघात असल्याने भारतीय गोलंदाजांसमोर इतर संघाच्या फलंदाजांचा कस लागेल. याचप्रमाणे इंग्लंडमधील गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी अप्रतिम झाली आहे. यजमान इंग्लंडपुढे चाहत्यांचे अपेक्षांचे ओझे असेल आणि त्याचाच फायदा उचलून आपण जगज्जेतेपदाची संधी साधू शकतो.

*  विश्वचषकाच्या स्वरूपाविषयी तुम्हाला काय वाटते?

यंदाच्या विश्वचषकात प्रत्येक संघाला साखळी फेरीत नऊ सामने खेळावयाचे असल्याने खेळाडूंची शारीरिक तसेच मानसिक दमछाक होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे खेळाडूंसमोर स्वत:च्या तंदुरुस्तीची काळजी घेणे, हे मुख्य लक्ष्य आहे. भारतीय संघ मात्र तंदुरुस्तीच्या बाबतीत आता फार सुधारला असून कर्णधार विराट कोहली त्याचे उत्तम उदाहरण आहे. संघातील एखाद-दुसरे खेळाडू वगळता जवळपास सर्वच जण पूर्णपणे तंदुरुस्त असून ते या लांबलचक विश्वचषकासाठी सज्ज आहेत, हे दिसून येते. आधुनिक क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या अंगी असलेल्या कौशल्यापेक्षा त्यांच्या तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिले जाते, त्यामुळेच गेल्या काही वर्षांत दुखापतीमुळे एखादा खेळाडू तब्बल पाच-सहा महिने क्रिकेटपासून दूर राहिला, असे क्वचितच निदर्शनास येते.

*  भारताला कोणत्या संघापासून कडवी झुंज मिळू शकते?

विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये इंग्लंडचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतीय संघात नामांकित खेळाडूंचा भरणा असला तरी त्यांनी इतर संघांना कमी लेखणे धोकादायक ठरू शकते. आशिया चषकात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघांनी भारताला विजयासाठी संघर्ष करायला भाग पाडले होते. माझ्या मते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या संघांपासून आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे.

*  विश्वचषकात भारताच्या कोणत्या खेळाडूची भूमिका सर्वाधिक मोलाची ठरू शकेल?

प्रत्यक्ष सामन्यात खेळणाऱ्या अकराही खेळाडूंची भूमिका भारतासाठी महत्त्वाची आहे. मात्र त्यातही एखाद-दुसऱ्या खेळाडूची निवड करायची झाल्यास कर्णधार कोहलीच्या कामगिरीवर संघाची सर्वाधिक मदार आहे, असे मला वाटते. गेल्या अनेक वर्षांपासून कोहलीने धावांचा पाठलाग करतानासुद्धा भारताला एकहाती सामने जिंकवून दिले आहेत. त्याशिवाय तो खेळपट्टीवर असल्यास इतर फलंदाजांना आत्मविश्वासाने फलंदाजी करता येते, तसेच प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजही दडपणाखाली असतात. कोहलीव्यतिरिक्त हार्दिक पंडय़ा या विश्वचषकात भारताचा हुकमी एक्का ठरू शकतो. गेल्या काही महिन्यांत हार्दिक खेळाडू म्हणून फार प्रगल्भ झाला असून त्याचे अष्टपैलुत्व भारतासाठी लाभदायक ठरेल. त्याशिवाय महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीविषयी तुम्हाला चिंता करण्याची कधीच गरज नसते. फलंदाजीपासून ते यष्टिरक्षणापर्यंत सर्वच बाबतीत तो छाप पाडेल, यात शंका नाही.

*  तुम्ही जर भारतीय संघाचे प्रशिक्षक असता तर चौथ्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजास पाठवले असते?

माझ्या मते गेल्या एक-दीड वर्षांपासून संपूर्ण भारतात फक्त चौथ्या क्रमांकावरील फलंदाज कोण, याचीच सर्वाधिक चर्चा सुरू आहे. व्यवस्थापनाने विचार करूनच संघ निवडला असून त्यानुसार ते चौथ्या क्रमांकावर योग्य त्या खेळाडूला फलंदाजीस पाठवतील. परंतु चौथ्या क्रमांकावरील खेळाडूची कामगिरी चांगली-वाईट झाली तरी भारतीय संघाला त्याचा इतका मोठा फटका पडणार नाही. मी परिपूर्ण अशा विजय शंकरलाच चौथ्या क्रमांकासाठी संधी दिली असती.

*  झिम्बाब्वे संघ विश्वचषकाची पात्रता मिळवण्यात अपयशी ठरला, त्याविषयी काय सांगाल?

झिम्बाब्वे विश्वचषकासाठी अपात्र ठरल्यानंतरच माझी प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. अफगाणिस्तानने आम्हाला पराभूत केल्यामुळे आमचे विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचे स्वप्न भंगले. अफगाणिस्तानचे गोलंदाज अप्रतिम असून कोणत्याही बलाढय़ संघाला धूळ चारण्याची त्यांच्यात क्षमता आहे. त्यामुळे आता २०२०च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरण्याच्या उद्देशाने मी संघबांधणी सुरू केली आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाची पात्रता फेरी रंगणार आहे, त्यामध्ये झिम्बाब्वे संघ नक्कीच उत्तम कामगिरी करेल.

इंग्लंडमधील गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिल्यास एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी अप्रतिम झाली आहे. यजमान इंग्लंडपुढे चाहत्यांचे अपेक्षांचे ओझे असेल आणि त्याचाच फायदा उचलून आपण जगज्जेतेपदाची संधी साधू शकतो.