नितीन कीर्तने, भारताचे माजी टेनिसपटू

ऋषिकेश बामणे

भारताकडे अनेक उदयोन्मुख टेनिसपटू असून आपल्याकडेही ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू घडवण्याची क्षमता आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे ध्यानचंद पुरस्कार विजेते टेनिसपटू नितीन कीर्तने यांनी व्यक्त केली.

पुण्याच्या ४५ वर्षीय नितीन यांना गेल्या आठवडय़ात प्रतिष्ठेचा ध्यानचंद पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सध्या भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील युवा पिढीचा कल टेनिसकडे वाढत असल्याचे मत मांडणाऱ्या नितीन यांच्याशी टेनिसची सध्याची परिस्थिती, आव्हाने आणि योजनांविषयी केलेली ही खास बातचीत-

*  भारतातील टेनिसच्या सद्य:स्थितीविषयी तुमचे काय मत आहे?

भारतात टेनिस हा खेळ लोकप्रिय करण्यात क्रीडा वाहिन्यांचे फार मोठे योगदान आहे. विम्बल्डन, अमेरिकन यांच्यासारख्या ग्रँडस्लॅम स्पर्धाचे भारतात थेट प्रक्षेपण करण्यात येत असल्यामुळे आपल्याकडील अनेक खेळाडू फक्त विदेशातील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठीसुद्धा वेळ काढून सामने पाहतात. यामुळेही त्यांना आपल्या खेळात सुधारणा करता येतात. भारतीय खेळाडूंविषयी म्हणायचे झाल्यास प्रज्ञेश गुणेश्वरन, सुमित नागल, अंकिता रैना यांसारखे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले आहेत. परंतु त्यांना कामगिरी उंचावण्याची अधिक आवश्यकता आहे, हेसुद्धा तितकेच खरे आहे.

*  महाराष्ट्रातही आता टेनिसची लोकप्रियता वाढते आहे का?

टेनिस हा एक महागडा खेळ असून प्रत्येकालाच यासाठी आर्थिक पाठबळ उभारणे जमतेच असे नाही. मात्र महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेमुळे (एमएसएलटीए) गेल्या काही वर्षांत निश्चितच टेनिसला चांगले दिवस आले आहेत. ऋतुजा भोसले, अर्जुन कडे यांसारखे खेळाडू टेनिसमध्ये महाराष्ट्राचे नाव कमावत आहेत. परंतु माझ्या मते आपण एखादा खेळाडू कनिष्ठ वयात असतानाच त्याच्यावर अधिक मेहनत घेतली, तर विशीत येईपर्यंत आपल्याकडेही ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू घडतील. अमेरिकेची १५ वर्षीय कोको गॉफ, कॅनडाची बियांका आंद्रेस्क्यू हे खेळाडू एक-दोन आठवडय़ांत उदयास आलेले नाहीत. १२-१३ वर्षांपासूनच त्यांच्या तंत्रावर मेहनत घेतल्यामुळे आज त्यांनी ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये सर्वाना स्वत:च्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले आहे. महाराष्ट्रातील युवा पिढी आता टेनिसमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी उत्सुक असून त्यांना योग्य दिशा दाखवणाऱ्यांची व पालकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

*  देशातील टेनिस प्रशिक्षकांबाबत तुम्ही काय सांगाल?

भारतात असंख्य अनुभवी टेनिस प्रशिक्षक आहेत. त्यांच्या अनुभवामुळेच गेल्या काही वर्षांत आपल्याला प्रतिभावान खेळाडू गवसले आहेत. सानिया मिर्झा, लिएण्डर पेस, महेश भूपती यांच्यासारख्या माजी खेळाडूंच्या अकादमीसुद्धा भारतात आहेत. परंतु या सर्वानी एकत्र येऊन एकच राष्ट्रीय टेनिस अकादमी सुरू करणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते. यामुळे खेळाडूच्या सर्वागीण विकासावर भर देता येईल. त्याशिवाय बॅडमिंटनप्रमाणे टेनिसमध्येही एकाच मुख्य प्रशिक्षकाखाली सर्व स्पर्धासाठी तयारी केली, तर ते खेळाडूंसाठीही सोयीस्कर ठरेल.

*  टेनिसच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कोणते उपाय सुचवाल?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेनिससाठी कॉर्पोरेट पाठबळ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. नेमबाजी, बॅडमिंटन यांसारख्या खेळांना कॉर्पोरेट कंपन्यांचा मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा लाभतो, परंतु टेनिसकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्याशिवाय आपल्याकडे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धाची संख्या कमी असून चीन, जपान यांसारख्या देशाप्रमाणे दर दुसऱ्या आठवडय़ाला एखादी स्पर्धा भरवल्यास खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होईल, असे मला वाटते.