भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने भारतीय फुटबॉल संघाच्या सामन्यांना हजेरी लावण्यासाठी सोशल मीडियावर चाहत्यांना आवाहन केलं. आमच्यावर टीका करा पण सामन्यांना हजेरी लावा असं भावनिक आवाहन छेत्रीने क्रीडाप्रेमींना केलं. या आव्हानाचा सकारात्मक परिणाम भारत विरुद्ध केनिया सामन्यात झालेला पहायला मिळाला. सुनील छेत्रीच्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मुंबईकर क्रीडा रसिकांनी भारतीय संघाला भरघोस पाठींबा दिला. मात्र अशाप्रकारे सामना पहायला या असं सांगावं लागणं, भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्सटनटाईन यांना चुकीचं वाटत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय फुटबॉल संघ चांगली कामगिरी करतो आहे. त्या कामगिरीच्या आधारावर, चाहत्यांनी आपल्या संघाचे सामने पाहण्यासाठी मैदानात गर्दी करायला हवी. मात्र प्रेक्षकांसाठी सोशल मीडियावर आवाहन करावं लागणं ही गोष्ट खेदजनक असल्याचं कॉन्सटनटाईन यांनी म्हणलं आहे. सुनील छेत्रीने केलेल्या आवाहनावर प्रतिक्रीया विचारली असतान कॉन्सटनटाईन यांनी आपलं मत व्यक्त केलं. इंटरकॉन्टिनेंटल चषकातील पहिल्या सामन्यात भारताने चीन तैपेईचा ५-० तर केनियाचा ३-० ने पराभव केला.

केनियाविरुद्ध सामन्यात आम्हाला प्रेक्षकांचा चांगला पाठींबा मिळाला. मात्र प्रेक्षकांनी मैदानात येऊन सामना पहावा यासाठी याचना करणं मला पटत नाही. तुमचा संघ चांगली कामगिरी करत असताना क्रीडा प्रेमींनी मैदानात गर्दी करुन संघाचं पाठबळ वाढवणं अपेक्षित आहे. मात्र प्रत्येक सामन्यात आम्हाला प्रेक्षकांचा हवा तसा पाठींबा मिळत नाही. या गोष्टीचं एक प्रशिक्षक म्हणून मला नक्कीच वाईट वाटलं. केनियाविरुद्ध सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कॉन्सटनटाईन यांनी आपलं मत मांडलं.