वन-डे मालिका गमावल्यानंतर टी-२० मालिकेत बाजी मारुन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली सुरुवात केलेल्या भारतासमोर आता कसोटी मालिकेचं आव्हान आहे. अॅडलेड कसोटी सामन्यात विराटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या सलामीवीरांनी पहिल्याच सामन्यात निराशा केली. कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे.

कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दाखल झालेला रोहित शर्माही दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत खेळू शकणार नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत भारतीय संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. परंतू माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या मते भारताकडे कोहली-रोहितशिवाय सामना जिंकवून देतील असे फलंदाज आहेत. “दोन्ही फलंदाजांच्या अनुपस्थितीत धावा करतील असे फलंदाज भारताकडे आहेत. भारतीय संघात फलंदाजीसाठी खूप चांगले पर्याय आहेत. न्यूझीलंडमध्येही रोहित शर्मा भारतीय संघात नव्हता. रोहितशिवाय एखादा दौरा खेळण्याची ही आपली पहिलीच वेळ नाहीये. क्रिकेटमध्ये काहीच शाश्वत नसतं. कधीकधी खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकतात. त्यामुळे संघाला एखाद्या खेळाडूशिवाय मैदानात उतरण्याची तयारी करावी लागते.” सचिन Reuters ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे आणि टी-२० मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता. NCA मध्ये फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर रोहितला कसोटी संघात स्थान मिळालं आहे. ऑस्ट्रेलियात १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर तो भारतीय संघात खेळू शकणार आहे. याचसोबत, पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी विराटला बीसीसीआयने विशेष सुट्टी मंजूर केली आहे.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणे चतूर, तो कसोटीत भारताचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करेल – सचिन तेंडुलकर